बहुतांश पोलिसांची योगासनाला नकारघंटा
By Admin | Published: January 12, 2017 04:34 AM2017-01-12T04:34:22+5:302017-01-12T04:34:22+5:30
केंद्र सरकार योगासनाच्या प्रसारासाठी आग्रही असले, तरी राज्यातील सुमारे पावणेदोन लाखांवर पोलीस मात्र
जमीर काझी / मुंबई
केंद्र सरकार योगासनाच्या प्रसारासाठी आग्रही असले, तरी राज्यातील सुमारे पावणेदोन लाखांवर पोलीस मात्र, रोज सकाळी उठून ‘अनुलोम-विलोम’ करण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथुर यांनी त्याबाबत वारंवार सूचना देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योगला थंड प्रतिसाद दिला आहे. ६० पोलीस घटकांपैकी मुंबईसह केवळ ७ घटक सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात योग प्रशिक्षण शिबिर सुरू ठेवले आहे.
केंद्राच्या आयुष योगा मंत्रालयांची ही महत्त्वाकांक्षी योग प्रशिक्षण योजना पोलीस दलात बारगळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना तातडीने कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली आहे. १५ जानेवारीपर्यंत त्याबाबत ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे. मानसिक स्वास्थ्य व निरोगी आयुष्य राहावे, यासाठी आयुष मंत्रालयाच्या योग प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस दलाकडून घेतला. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, अधीक्षक, प्राचार्य, सर्व समादेशक, नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालकांना ही योजना राबविण्याची सूचना करण्यात आली. पोलीस अधिकारी-अंमलदारांना योगाचे महत्त्व व प्रशिक्षण देण्यासाठी लोणावळा येथील कैवल्यधाम या संस्थेची नियुक्ती करण्यात आली. या संस्थेकडून सर्व घटकांसाठी योग प्रशिक्षकांची निश्चिती करून त्यांंच्याशी संपर्कात राहून शिबिराच्या नियोजनाचे आदेश देण्यात आले होते. मुख्यालयाने सुुचविल्याप्रमाणे योग शिबिर सुरू केले आहेत. मात्र, उर्वरित ५३ घटकांकडून त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पावणेदोन लाखांहूनही अधिक पोलीस योगासने करण्यासाठी इच्छुक नसल्याचे समोर आले आहे. सर्व घटकांनी तातडीने प्रशिक्षण शिबिर, त्यासाठी बॅँक खाते सुरू करून, त्याबाबतची सविस्तर माहिती १५ जानेवारीपर्यंत मुख्यालयाला सादर करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत.
ताणामुळे अनुत्सुक
अनेकदा पोलिसांना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे योगासनाला जाण्याची इच्छाही होत नसल्याने, प्रशिक्षण योजना राबविण्यात अडचणी येत आहेत. ते सुरू केले, तरी किती अंमलदार त्यामध्ये सहभागी होतील, याची खात्री नाही. त्यामुळे जादा कामाच्या विभाजनाच्या दृष्टीने आधी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.