भविष्यवेधी अभ्यासक्रमांकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल, अभियांत्रिकीच्या पारंपरिक उपशाखा नकोशा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:04 AM2024-08-19T06:04:38+5:302024-08-19T06:08:08+5:30
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे ९८ अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असून, त्याशिवाय संगणकाशी संबंधित डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आदी अभ्यासक्रमांना पसंती मिळत असल्याचे सीईटी सेलच्या प्रवेशाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यभरात एक लाख ६० हजार ३४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एक लाख ९२ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेल्या एक लाख ७६ हजार १११ विद्यार्थ्यांपैकी एक लाख २६ हजार ४५८ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे.
राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी अंतर्गत विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. त्यात ५-जी तंत्रज्ञानापासून टेक्सटाइलपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यातही संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांची संख्या जास्त आहे.
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार प्रवेश
संगणक अभियांत्रिकी :
सर्वाधिक २२,६५८
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन : १४,७४७
मेकॅनिकल : १४,२६९
माहिती तंत्रज्ञान : ११,०३३
स्थापत्य अभियांत्रिकी : ९,८१४
विद्युत अभियांत्रिकी : ८,०७०