आषाढी वारीमध्ये केलेल्या कामाचे सर्वाधिक समाधान – जिल्हाधिकारी मुंढे
By admin | Published: May 1, 2016 06:59 PM2016-05-01T18:59:37+5:302016-05-01T18:59:37+5:30
पंढरपूर आषाढीवारीनिमित्त केलेले काम सर्वाधिक महत्त्वाचे आणि समाधानाचे होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 1- आजपर्यंतच्या सेवा कालावधीत सोलापूरचा कार्यकाळ समाधानकारक होता. त्यातही पंढरपूर आषाढीवारीनिमित्त केलेले काम सर्वाधिक महत्त्वाचे आणि समाधानाचे होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष समारंभात बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विजय काळम – पाटील, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, लोकसेवक या माध्यमातून काम करताना वैयक्तिक हितापेक्षा लोकहिताला प्राधान्य देवून नियमानुसार काम केले पाहिजे. हा मार्ग अवघड, खडतर असतो. यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. कामाशी बांधील (कमिटमेंट) राहून संस्थात्मक काम झाले पाहिजे. सध्या चालु असलेली विविध कामे एक दीड महिना चालू ठेवनू पुढे न्यावीत. आपणामध्ये खुप क्षमता आहे त्याचा वापर करा, स्वत:ला सशक्त करा, त्यानंतर लोकांना सशक्त करा, स्वत:मध्ये, इतरांमध्ये बदल करताना त्रास होतो. पण काही काळ त्रास होतो, परंतू त्यानंतर काही काळाने कायमस्वरुपी त्रास होतो. जीवनात हे तत्व अंगीकरावे असे आवाहन श्री. मुंढे यांनी केले.
जीवन मूल्य व तत्वावर आधारित जगले पाहिजे स्वत:ला समाधान मिळण्यासाठी काम करा, चांगल्या सवयी लावा यासाठी चांगला विचार करा नंतर त्याप्रमाणेच वागा, परत तेच करा यामुळे सवय लागेल सवय झाली की यातून संस्कृती निर्माण होते त्यानंतर मूल्य तयार होते. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. प्रशासनात काम करताना भावनिक होण्यापेक्षा संवेदनशील व्हा असे आवाहन श्री. मुंढे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त काळम – पाटील यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कार्यपध्दतीबद्दल बोलताना वेगळेपण हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट होते असे सांगितले तर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कामाची पध्दत वेगळी असली तर नियमानुसार कामे करणे लोकहिताची कामे करणे हाच त्यांचा उद्देश होता. टीम वर्क म्हणून त्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे असे गौरवोद्गार काढले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, प्रांताधिकारी शहाजी पवार, श्रीमती मनिषा कुंभार, अधिक्षक अभियंता राजकुमार कांबळे, नगरपालिका विभागाचे प्रशासन अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदींनी श्री. मुंढे यांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला तसेच त्यांच्या कार्याबाबतची समायोचित भाषणे झाली.