चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या
By admin | Published: August 14, 2014 01:25 AM2014-08-14T01:25:28+5:302014-08-14T01:25:28+5:30
दीड वर्षांच्या चिमुकलीची पाण्याच्या टाक्यात बुडवून हत्या केल्यानंतर महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन सुभेदार लेआऊटमध्ये आज सकाळी
नागपूर : दीड वर्षांच्या चिमुकलीची पाण्याच्या टाक्यात बुडवून हत्या केल्यानंतर महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन सुभेदार लेआऊटमध्ये आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव ज्योत्स्ना बलबीर गोंडाणे (वय २७) असून, तिच्या दीड वर्षीय चिमुकलीचे नाव इशिका आहे. हुडकेश्वर मार्गावरील केशवराव यादव वाडे (वय ६९) यांच्याकडे गोंडाणे पत्नी ज्योत्स्ना तसेच इशिका आणि सम्यक (वय ८) या मुलांसह भाड्याने राहातात. गोंडाणे खासगी फोटोग्राफी करतात. चार दिवसांपूर्वी कामाच्या निमित्ताने ते बाहेरगावी गेले. जोत्स्ना, इशिका आणि सम्यक नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री जेवण करून झोपले. आज सकाळी ८ च्या सुमारास सम्यकला जाग आली तेव्हा त्याची आई पाळण्याच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली.
ज्योत्स्नाने लिहिल्या चार चिठ्ठ्या
घटनास्थळी पोलिसांना चार चिठ्ठ्या आढळल्या. त्यातील एक चिठ्ठी पतीला उद्देशून होती. ‘सम्यकचे पप्पा.. . अशी सुरुवात असलेल्या या चिठ्ठीत ‘त्या’ दोघांनी मला खूप त्रास दिला. ‘त्याने‘ जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे जोत्स्नाने लिहिले आहे. दुसऱ्या एका चिठ्ठीत तिने पती बलवीरबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे. पती खूूपच चांगला असल्याचे ज्योत्स्नाचे मत आहे. पोलीस आता ‘त्या‘ दोघांची चौकशी करणार आहेत.
पाण्याच्या टाकीत ईशिकाचा मृतदेह
आईला पाहून सम्यक किंचाळत बाहेर आला. त्याने घरमालकाच्या परिवाराला माहिती दिली. घरमालकाचा परिवार आणि शेजारी गोंडाणे राहात असलेल्या रूममध्ये आले. गळफास लावलेल्या जोत्स्नाचा मृतदेह पाहून त्यांनी सक्करदरा पोलिसांना कळविले. त्यानुसार, सक्करदरा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. दरम्यान, सम्यकची बहीण इशिका दिसत नसल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. बाजूच्या महिलेने पाण्याच्या टाकीत डोकावले असता चिमुकल्या इशिकाचा मृतदेह टाक्यात आढळला. या घटनेची वार्ता शहरात वायुवेगाने पसरली.
चिमुकली इशिका पाण्याच्या टाकीत स्वत: उडी घेणार नाही, हे निश्चित. त्यामुळे तिला टाक्यात फेकले असावे, असा सर्वांचाच अंदाज होता. घटनास्थळी पोलिसांनी दिवसभर कसून तपासणी केली. त्यांना आढळलेल्या पुराव्यावरून जोत्स्नानेच इशिकाला पाण्यात बुडवून ठार मारले आणि नंतर आत्महत्या केल्याचा निष्कर्ष सक्करदरा पोलिसांनी काढला. रात्री या प्रकरणी पोलिसांनी मृत जोत्स्नाविरुद्ध इशिकाचा खून केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
ज्योत्स्नानेच केली हत्या
चिमुकल्या ईशिकाची हत्या जोत्स्नाने केली असती तर तिने सम्यकला कसे सोडले असते, असा प्रश्न घटनास्थळी अनेक जण व्यक्त करीत होते. तिनेच हे सर्व केले की दुसऱ्याच कुणी हत्या करून आत्महत्येचा देखावा निर्माण केला, अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली होती. पोलीसही प्रारंभी यावर काही मत व्यक्त करीत नव्हते. दिवसभराच्या तपासानंतर पोलिसांनी जोत्स्नानेच हे सर्व केल्याचा निष्कर्ष काढला. पोलीस निरीक्षक महेश्वर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलवीर फोटो काढण्यासाठी (आॅर्र्डरवर) शनिवारी अमरावतीला गेला होता. त्याचा परिवार राहत असलेल्या खोलीचे दार आतून बंद होते. सकाळी सम्यकने आईचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून दार उघडले आणि बाहेर आला. यावरून जोत्स्नाने ईशिकाला पाण्यात बुडवले त्यानंतर ती घरात आली अन् तिने दार बंद करून गळफास लावून घेतल्याचे स्पष्ट होते. जर दुसऱ्या कुण्या व्यक्तीचा हात या घटनेत असता तर जोत्स्नाच्या खोलीचे दार एक तर उघडे असते किंवा बाहेरून बंद असते, असेही मत नोंदवले. दार आतून बंद होते. त्यामुळे आत्महत्येपुर्वी जोत्स्नानेच ईशिकाची हत्या केल्याचा पोलिसांनी निष्कर्ष काढल्याचे सिंग म्हणाले.