आईनं सोडलं दोन महिन्याचं तान्हुलं, अन् खाकी वर्दीतील मायेला फुटला पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:13 PM2020-01-10T15:13:33+5:302020-01-10T15:16:08+5:30
ज्याला कोणी नाही त्याला पोलीस आहे़़़हृदयद्रावक प्रसंगाची पंढरपुरात चर्चा
सचिन कांबळे
पंढरपूर : दोन महिन्यांचं तान्हुलं.. मातेनं सोडून दिलं.. त्याला जणू परक्याचा स्पर्श जाणवला अन् हुंदके देत रडू लागलं.. त्या परक्यांनाही काय करावं कळेना..अखेर तान्हुलं थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं..इथंही खाकी वर्दीनं त्याची इमानेइतबारे शुश्रूषा करून मायेचा आधार दिला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक प्रसंगाची पंढरपुरात दिवसभर चर्चा सुरू झाली.
शहरातील चौफाळा चौकातील कृष्णाच्या मंदिराजवळ दुपारच्या वेळेस एक अज्ञात महिला दोन महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन बराच वेळ बसली होती. त्याठिकाणी असलेल्या सचिन व्यवहारे, मनोज वाडेकर व धैर्यशील काळे यांना मी लघुशंका करायला जाऊन येते, तोपर्यंत या मुलीला सांभाळा, असे म्हणून त्या तेथून निघून गेल्या. त्यानंतर अर्धा तास, एक तास झाला तरी ती महिला लहान मुलीला घेण्यास आली नाही. यामुळे वरील तिघांनी त्या चिमुकल्या बाळास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या ठिकाणी त्या मुलीस पोलीस कॉन्स्टेबल सोनाली इंगोले, पौर्णिमा हादगे, प्रियांका मोहिते यांनी नवे कपडे घालून बाटलीद्वारे दूध पाजून शांत केले़ त्यानंतर सर्वच पोलीस त्या बाळाला खेळवू लागले़ या हृदयद्रावक घटनेनंतर ज्याला कोणी नाही त्याला पोलीस आहे, असा संदेश जनमानसात गेल्याचे दिसून आले.
शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिलेविरुद्ध सरकारतर्फे ३१७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या चिमुकलीला नवरंगे बालकाश्रमात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.
बाटलीतलं दूध पिताच तान्हुलं हसलं
गंभीर प्रसंग असताना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तान्हूल्याला जेव्हा महिला कॉन्स्टेबर सोनाली इंगोले, पौर्णिमा हादगे, प्रियंका मोहिते यांनी अलगदपणे हाती घेऊन मायेचा हात फिरवला. बाटलीद्वारे दूध पाजलं. तेव्हा कुठे मलूल चेहºयानं रडून लालबूंध झालेल्या तान्हूल्याच्या चेहºयावर हासू विलसंल. हृदय पिळवटून टाकणाºया या प्रसंगातही क्षणभर साºयांच्या चेहºयावर समाधानाची लकेर दिसली.