मुलीच्या सूचनेवरून आईने केला बलात्काराचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 10:46 PM2017-07-24T22:46:49+5:302017-07-24T22:46:49+5:30

कळव्याच्या घोलाईनगरमध्ये रविवारी सायंकाळी झालेली कथित सामूहिक बलात्काराची घटना हा बनाव असल्याचे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उघड केले.

The mother made rape by the girl's suggestion | मुलीच्या सूचनेवरून आईने केला बलात्काराचा बनाव

मुलीच्या सूचनेवरून आईने केला बलात्काराचा बनाव

Next

- जितेंद्र कालेकर/ आॅनलाइन लोकमत

ठाणे, दि. 24 - कळव्याच्या घोलाईनगरमध्ये रविवारी सायंकाळी झालेली कथित सामूहिक बलात्काराची घटना हा बनाव असल्याचे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उघड केले. जेमतेम १४ वर्षे वयाच्या मुलीनेच आपल्या आईला बलात्काराचा बनाव करण्याची सूचना केली व तिने ती अंमलात आणल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनाही धक्का बसला. आपल्या वडिलांना तुरुंगात जाण्याकरिता ज्यांनी भाग पाडले, त्यांना इंगा दाखवण्याकरिता हा बनाव रचला गेला होता.
कळव्यातील ३२ वर्षीय महिलेने पोलिसांना रविवारी दिलेल्या तक्रारीनुसार गोपाल कल्लीम, रंगाप्पा, शेखर शंके, शिरसप्पा आणि व्यंकटेश रेड्डी यांनी तिच्या घरात जबरदस्तीने शिरून सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास सामूहिक बलात्कार केला. शिरसप्पा याने तिच्या अंगावर अ‍ॅसिड टाकून तिला जखमी केले. या अत्यंत गंभीर तक्रारीमुळे पोलीस हादरले. त्या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक आयुक्त रमेश धुमाळ, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली. तातडीने गोपाल, रंगाप्पा आणि शेखर या तिघांना घोलाईनगर भागातून अटक केली. त्यांच्याकडे उर्वरित तिघांची चौकशी केल्यानंतर ते तिघे गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकात असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी दुपारपर्यंत शिरसप्पा आणि रामूल या दोघांची व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उपायुक्त स्वामी यांनी ओळख पटवली, तर त्यांचा तिसरा साथीदार व्यंकटेश यालाही कर्नाटक पोलिसांच्या मदतीने शोधण्यात आले. बलात्काराच्या आरोपातील तिघे जण कर्नाटकात असतील, तर मग इथे ही महिला त्यांचे नाव कसे काय घेते, असा प्रश्न पोलिसांना पडला.

मुलीने दिली कबुली...
या महिलेचे पती व्यंकटेश यांनी दीड वर्षापूर्वी शिरसप्पाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले होते. याच अ‍ॅसिड हल्ल्यात त्याला अटक झाल्याने तो कारागृहात होता. नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, शिरसप्पा व त्याचे साथीदार आपल्यावर हल्ला करतील किंवा अन्य कुठल्या तरी आरोपाखाली आपल्याला पुन्हा तुरुंगात धाडतील, अशी भीती व्यंकटेशला वाटत होती. त्यामुळे जामिनावर सुटल्यावर त्याने ही भीती आपल्या पत्नीला सांगितली. तेव्हा फोनवरील हे संभाषण मुलीने ऐकले. वाहिन्यांवरील क्राइम सिरियल्स सतत बघणाऱ्या मुलीनेच आपल्या आईला बलात्काराचा बनाव करण्याची आणि कर्नाटकमध्ये असलेल्या शिरसप्पा व त्याच्या साथीदारांना सामूहिक बलात्काराच्या आरोपात गोवण्याची क्लृप्ती सुचवली.

आई व मुलीच्या जबाबात तफावत...
बलात्कारानंतर आरोपींनी फेकलेल्या अ‍ॅसिडची बाटली केवढी होती, असा सवाल पोलिसांनी पीडित महिला आणि मुलीस केला असता वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. आरोपींनी अ‍ॅसिड फेकले हा दावा खरा मानला, तर त्या महिलेच्या शरीरावर एकाच ठिकाणी अ‍ॅसिडची जखम होती. घरात कोठेही अ‍ॅसिडचा साधा डाग दिसून आला नाही. अ‍ॅसिड असे शरीराच्या ठरावीक भागावर कसे फेकले जाऊ शकते, असा सवालही पोलिसांना पडला. त्यामुळे पोलिसांनी महिलेच्या अन्य दोन मुलांना बाजूला घेऊन विचारपूस केली असता त्यांनी बनावाची कबुली दिली.

पतीच्या संगनमताने बनाव केला का?
महिलेचा पती काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटला व त्यानंतर गावाला गेला होता. रविवारी सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केल्यानंतर सोमवारी तो परत आला. मात्र, या बनावाची आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता हा बनाव करण्यात त्याचा सहभाग होता किंवा कसे, हेही पोलीस शोधून काढणार आहेत. मुळात बलात्कार झाला की नाही, सोमवारी अटक केलेल्या तिघांची सुटका करायची किंवा कसे, असे अनेक गुंते पोलिसांना सोडवायचे असल्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी सांगितले. घटनेच्या वेळी आरोपींच्या मोबाइल लोकेशनपासून इतर सर्वच बाबींची तपासणी करून पोलिसांना हा बनाव आहे की, खरोखर बलात्कार झाला आहे, याच्या अंतिम निष्कर्षाप्रत यायला काही कालावधी लागणार आहे.

 

Web Title: The mother made rape by the girl's suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.