जन्मत:च मोतीबिंदूग्रस्त मुलीने सहा वर्षांनी प्रथमच पाहिले आई-वडील
By admin | Published: February 24, 2015 04:21 AM2015-02-24T04:21:33+5:302015-02-24T04:21:33+5:30
कर्जत तालुक्यातील कशेळे गावाजवळच्या पेंढारी आदिवासी वाडीतील गिरी दाम्पत्यांच्या पोटी काही वर्षांपूर्वी जन्मत: मोतीबिंदू असलेली सविता जन्माला आली.
जयंत धुळप, अलिबाग
कर्जत तालुक्यातील कशेळे गावाजवळच्या पेंढारी आदिवासी वाडीतील गिरी दाम्पत्यांच्या पोटी काही वर्षांपूर्वी जन्मत: मोतीबिंदू असलेली सविता जन्माला आली. त्यामुळे तिच्याबरोबरच गिरी कुटुंबीयांचेही जीवन अंधकारमय झाले होते. मात्र आता तिच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने तब्बल सहा वर्षांनी ती आपल्या पालकांना पाहू शकली.
सविता एक वर्षाची असताना तिला व्यवस्थित दिसत नाही, ती घरातल्यांना नीट ओळखू शकत नाही, हे तिचे वडील वाकुल गिरी यांच्या लक्षात आले. घरची बेताची परिस्थिती, आणि आज ना उद्या फरक पडेल, या आशेने त्यांनी सविताचे संगोपन केले. मात्र दृष्टी अत्यंत अधू असल्याने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तिच्यावर उपचार सुरू असताना कशेळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेत्रचिकित्सा अधिकारी रमेश पवार यांनी तिची तपासणी केली. प्राथमिक तपासण्यांअंती, सविताला जन्मत:च मोतीबिंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पवार यांनी सविताच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे सातत्याने प्रबोधन केले आणि गावठी उपचार करण्याऐवजी तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्यावर तिला व्यवस्थित दिसू लागेल, असा विश्वास गिरी दाम्पत्यास दिला. सरकारच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून कशेळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींसाठी विशेष नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात पवार यांनी सविताला आणले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सविताच्या डोळ्यांची तपासणी केली. पुण्यातील एका नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व कशेळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षिका डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी नेत्रचिकित्सा अधिकारी रमेश पवार यांचे अभिनंदन केले आहे; तर आदिवासी गिरी कुटुंबाने त्यांचे आभार कसे मानावे असाच प्रश्न पडल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.