‘त्या’ मातेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव

By admin | Published: April 29, 2015 12:03 AM2015-04-29T00:03:59+5:302015-04-29T01:04:09+5:30

धक्कादायक : मुलाच्या पगारातील वाटा मिळण्याची मागणी

The mother of the 'mother' was educated | ‘त्या’ मातेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव

‘त्या’ मातेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव

Next

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर प्रभारी मुख्याध्यापक मुलाने दुर्लक्ष केले. दरमहा पगारातील पैसे चरितार्थासाठी दिले नाहीत; त्यामुळे जगायचे कसे या विवंचनेत असलेल्या मातेने सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांच्याकडे धाव घेतली. मुलाच्या पगारातील काही रक्कम मला जगण्यासाठी मिळावी, अशी आर्त विनवणी तिने केली. आई-वडिलांची सेवा करा, असे उपदेशाचे डोस पाजणाऱ्या करवीर तालुक्यातील तुळशी नदीच्या कुशीत वसलेल्या आणि नावात ‘वाडी’ असलेल्या गावातील ‘सरां’ची ही कथा आहे
शाळेत शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. याशिवाय त्यांनी चांगले संस्कार करणेही अपेक्षित असते. जन्मदात्या आईवडिलांची वृद्धापकाळात सेवा करावी, असे संस्कार गुरू करीत असतात. असे धडे देणारेही प्रत्यक्षात आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणाकडे वृद्धापकाळात दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ या म्हणीची प्रचिती येते.
सोमवारी चक्क साठी ओलांडलेली एक माता थेट शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत आली. तिने आपली करुण कथा मांडली. मला मुलाविषयी तक्रार करायची नाही. मात्र अपरिहार्यता झाली आहे. विभक्त राहते. दोन मुले आहेत. एक मुलगा मुंबईत नोकरी करतो, दुसरा गावातील हायस्कूलमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आहे. शिक्षक मुलाकडे मी चरितार्थासाठी पैशाची मागणी केली. मात्र तो देत नाही, असे तिने गाऱ्हाणे मांडले. एका मातेची ही अवस्था ऐकून शिक्षणाधिकारी भावुक झाल्या. मुलांच्या पगारातील हिस्सा आईसाठी देता येतो का, यासंबंधीचे शासनाचे नियम काय आहेत, हे पाहते, असा शब्द त्या मातेला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला. शब्दाचा दिलासा मिळाल्यामुळे ती माता निघून गेली.
ती माता कार्यालयातून निघून गेल्यानंतर तो ‘सर’ मुलगाही शिक्षणाधिकारी यांना भेटला. त्याने आपली बाजू मांडली. आई कशी चुकते, मी कसा बरोबर आहे, असा त्याने युक्तिवाद केला. यानिमित्ताने पुन्हा एकदा वृद्ध आईवडिलांकडे सुशिक्षित लोकही दुर्लक्ष करीत असल्याचे पुढे येत आहे.


एक वृद्ध माता आली होती. मुलाच्या पगारातील काही वाटा आपल्याला जगण्यासाठी मिळावा, अशी तिने मागणी केली. यानिमित्ताने पगारातील असा हिस्सा आईवडिलांना देण्याचा शासनाचा नियम आहे का, याची माहिती घेत आहे.
- ज्योस्त्ना शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: The mother of the 'mother' was educated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.