त्याच्यासाठी आईच सरस्वती अन् शारदाही!
By admin | Published: March 8, 2015 01:52 AM2015-03-08T01:52:07+5:302015-03-08T01:52:07+5:30
चिंचवडमधील एका मातेने कष्टपूर्वक आपल्या मुलातील कमतरतेवर मात करून त्याच्यात विशेष नैपुण्य आणले आहे. अक्षर न जाणणारा पृथ्वी आता शास्त्रीय गायक बनला आहे.
संजय माने ल्ल पिंपरी-चिंचवड
निसर्गत: बौद्धिक, शारीरिक कमतरता असलेल्या मुलांचे संगोपन करण्याचे पालकांसमोर मोठे आव्हान असते. परंतु पिंपरी-चिंचवडमधील एका मातेने कष्टपूर्वक आपल्या मुलातील कमतरतेवर मात करून त्याच्यात विशेष नैपुण्य आणले आहे. अक्षर न जाणणारा पृथ्वी आता शास्त्रीय गायक बनला आहे.
इंगळे दाम्पत्याचा लाडका ‘पृथ्वी’ सर्वसाधारण मुलांप्रमाणे नाही. त्याला ‘विल्यम सिंड्रोम’ आहे. त्यामुळे त्याच्या शारीरिक वाढीवर मर्यादा आहेत. स्पीच, अॅक्युपेशनल, म्युझिक, प्ले व मसाज थेरपी याद्वारे त्याच्यात बदल घडवून आणावे लागतील, असे डॉक्टरांनीही सांगितले होते.
दया इंगळे डॉक्टरांच्या सल्लानुसार मुलाला घडविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. संसार सांभाळत त्याच पृथ्वीच्या डॉक्टर बनल्या. त्याच्यासोबत तासन्तास घालवत डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार केले. त्यामुळे सुरुवातीला तीन वर्षे शब्दोच्चारही करू शकत नसलेला पृथ्वी बोलू लागला. स्वत:ची कामे स्वत: करू लागला. कोठूनही संगीत कानी पडले तर तो रडता रडता शांत व्हायचा. त्यातून त्याला संगीताची आवड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संगीत शिक्षकामार्फत त्याच्यावर ड्रम थेरपी करण्यात आली. ठेका, ताल याला तो विशेष प्रतिसाद देऊ लागला. त्याला औंध येथील बालकल्याण संस्थेत नेऊन गायन शिकविण्यास सुरुवात केली. त्यातून पृथ्वीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. ११ वर्षांच्या पृथ्वीने शास्त्रीय संगीताची पहिली परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. आता तो २५ शास्त्रीय राग गाऊ शकतो. शास्त्रीय व सुगम संगीत या विषयांवरील दोन तासांच्या संगीत मैफलीत तो सहभाग घेतो. तो उत्तम पियानो वाजवतो. महापालिकेत कार्यकारी अभियंता असलेले त्याचे वडील सतीश इंगळे यांनाही गायनाची आवड आहे. त्यांच्याबरोबर पृथ्वी जुगलबंदीही करतो.
‘पृथ्वी थेरपी सेंटर’ नव्हे एक चळवळ!
पृथ्वीसारख्या इतर मुलांसाठी काहीतरी करावे, या उद्देशाने पृथ्वीच्या आई-वडिलांनी घरातच विशेष मुलांना घडविण्याचे केंद्र तयार केले आहे. ‘पृथ्वी थेरपी सेंटर’मध्ये आता सुमारे २० विशेष मुलांना एकाच ठिकाणी विविध थेरपींची सुविधा प्राप्त झाली आहे. त्यांच्यातही बदल घडून येत आहेत.