चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 10:52 PM2021-07-09T22:52:27+5:302021-07-09T22:54:49+5:30
आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह आईने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भेंडाळा बीटमधील कान्होली गावाजवळ घडली.
तीन दिवसांपासून होत्या बेपत्ता; कारण गुलदस्त्यात
चामोर्शी (गडचिरोली) : आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह आईने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भेंडाळा बीटमधील कान्होली गावाजवळ घडली. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मायलेकींचा मृतदेह शुक्रवारी (दि. ९) कुजलेल्या स्थितीत विहिरीत तरंगताना आढळला.
सुरभि प्रणीत बारसागडे (२५) आणि प्रिशा प्रणीत बारसागडे (दीड वर्ष) अशी या मायलेकींची नावे आहेत. चामोर्शीपासून ८ किलोमीटरवर असलेल्या कान्होली येथील त्या रहिवासी होत. तीन दिवसांपूर्वीच त्या बेपत्ता झाल्या. शोधाशोध करूनही सापडल्या नसल्यामुळे प्रणीत बारसागडे यांनी बुधवारी (दि. ७) संध्याकाळी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, भेंडाळाजवळील शेतशिवारात असलेल्या पोलीसपाटलाच्या विहिरीत शुक्रवारी दोघींचेही मृतदेह तरंगत असल्याचे पोलीसपाटलाच्या मुलाला दिसले. याबाबतची माहिती लगेच चामोर्शी पोलिसांना देण्यात आली.
पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, हवालदार चंद्रशेखर गमपलवार, हवालदार ज्ञानेश्वर लाकडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढले. मृतदेह कुजलेले असल्याने घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले.
आत्महत्याच की घातपात?
मायलेकींच्या या आत्महत्येमागील गूढ अद्याप कायम आहे. या घटनेला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे वरकरणी वाटत असले तरी नेमके कारण शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातही ही आत्महत्याच आहे की घातपात, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसात याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहे.