नवजात बालकासह अपहरण करून आईचा खून
By admin | Published: June 20, 2016 01:29 AM2016-06-20T01:29:01+5:302016-06-20T01:29:01+5:30
ससून शासकीय रुग्णालयामधून बाळंतिणीसाठीचे अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तिच्या २५ दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्यानंतर
पुणे : ससून शासकीय रुग्णालयामधून बाळंतिणीसाठीचे अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तिच्या २५ दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्यानंतर या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. बाळ पळवून नेण्यात आले. या बाळाची विक्री करण्यासाठी हे अपहरण आणि खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी बाळाची रविवारी पहाटे सुखरूप सुटका केली.
मधू रघुनंदन ठाकूर (वय २५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी निकिता संतोष कांगणे (वय ३०), चंद्रभागा कृष्णा उडानशिवे (वय ३५) लक्ष्मी ऊर्फ पिंकी बालाजी जाधव (वय १९), आकाश उडानशिवे (वय १९, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधु ठाकूर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मधू या गरोदर असताना आरोपी निकिताने अंगणवाडीसेविका असल्याचे सांगत ठाकूर कुटुंबीयांशी ओळख वाढवली. त्यांना प्रसूतीसाठीचा खर्च मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. बाळंत झाल्यानंतर आरोपींनी त्यांना दोन वेळा घरी नेले. त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यांच्या २५ दिवसांच्या बाळाला लस आणि अन्य औषधे देण्याच्या बहाण्याने आरोपी निकिताने मधूचा विश्वास संपादन केला.
ससून रुग्णालयातील शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने या चौघांनी त्यांना शुक्रवारी सोबत नेले. मधू दिवसभरात घरी न परतल्याने पती रघुनंदन यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी निकिताला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. बराच वेळ पोलिसांना न बधलेल्या निकिताला चंद्रभागा आणि तिचा मुलगा आकाश ह्यांनी मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले.
शनिवारी दिवसभर आरोपी पोलिसांना सहकार्य करीत नव्हते.
रात्री त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच निकिताने मधूच्या खुनाची कबुली देत तिचा मृतदेह रामटेकडी रेल्वे जंक्शनजवळ टाकल्याचे तिने सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनतर बाळाचा शोध सुरू करण्यात आला. हे बाळ लक्ष्मीच्या ताब्यात असल्याचे निकिताकडून समजताच पोलिसांनी काळेपडळ भागात जाऊन लक्ष्मीलाही ताब्यात घेत बाळाची सुखरूप सुटका केली. हे बाळ चंद्रभागा हिला हवे होते. तसेच त्या बाळाची पुढे एका व्यक्तीला विक्री करण्यात येणार होती. या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. मधू आणि तिचा पती रघुनंदन उत्तर प्रदेशातील आहेत. (प्रतिनिधी)