प्रियकराच्या मदतीने आईचा खून

By admin | Published: October 1, 2014 12:49 AM2014-10-01T00:49:32+5:302014-10-01T00:49:32+5:30

एका मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना टिमकी भानखेडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हादरले आहे.संगीता अशोक नायक (४०) असे मृत आईचे नाव आहे.

Mother's blood with the help of a boyfriend | प्रियकराच्या मदतीने आईचा खून

प्रियकराच्या मदतीने आईचा खून

Next

टिमकी हादरले : मध्य प्रदेशात सापडले आरोपी
नागपूर : एका मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना टिमकी भानखेडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हादरले आहे.संगीता अशोक नायक (४०) असे मृत आईचे नाव आहे. संगीताच्या पतीचा २००९ मध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून ती आपली २० वर्षीय मुलगी अंजली ऊर्फ संध्या हिच्यासोबत राहत होती. मागील ८ महिन्यांपासून ती जांगरीपुरा टिमकी येथील भुवनेश्वर वाघमारे यांच्या घरी किरायाने राहत होती.
संगीता ही रामाकोना सौंसर येथील २८ वर्षीय शरद ऊर्फ आशिष हरीप्रसाद शर्मा याच्या ‘मेस’मध्ये काम करीत होती. संगीताने तिची मुलगी संध्या हिचे तीन वर्षांपूर्वी सागर नावाच्या मुलासोबत लग्न करून दिले होते.
ती सागरसोबत काही दिवस कळमन्यात राहिली. नंतर पतीला सोडून ती पुन्हा संगीतासोबत राहू लागली. संध्याला दोन वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. दोन वर्षांपासून शरद संगीताच्या घरी येत जात आहे. या दरम्यान त्याचे संगीतासोबत संबंधही प्रस्थापित झाले. परंतु मागील काही दिवसांपासून शरदने संगीताला सोडून तिची मुलगी संध्याला जवळ केले. त्याने संध्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु संगीता याचा विरोध करू लागली. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणं होऊ लागली.
सूत्रानुसार संगीताचा विरोध लक्षात घेता तिचा काटा काढण्यासाठी शरद आणि संध्याने तिचा खून करण्याची योजना आखली. दोघांनी सोमवारी रात्री ओढणीच्या साहाय्याने संगीताचा गळा आवळून खून केला.
तिचे पाय दोरीने बांधून मृतदेह एका पोत्यामध्ये भरला. त्यानंतर घरापासून २०० मीटर दूर अंतरावर पाचपावलीतील पहिल्या रेल्वे फाटकास्थित रुळाजवळ फेकून दिले आणि पोबारा केला. पोत्याचे तोंड उघडे असल्याने मंगळवारी सकाळी रेल्वेच्या गँगमॅनची मृतदेहावर नजर गेली. त्यांनी तहसील पोलिसांना सूचना दिली.
संगीताची मावस बहीण शारदा गजभिये यांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर तिने शरद व संध्याच्या संबंधाची माहिती सुद्धा दिली.
शरद आणि संध्या गायब असल्याने पोलिसांनाही पूर्ण प्रकार लक्षात यायला वेळ लागला नाही. ‘मोबाईल लोकेशन’च्या आधारावर आरोपी मध्य प्रदेशात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची एक चमू तातडीने मध्य प्रदेशात पाठविण्यात आली. रात्री उशिरा दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. दोघांनीही खून केल्याचे कबूल केले आहे.(प्रतिनिधी)
गंभीर आजाराची चिंता
संगीता गंभीर आजाराने त्रस्त होती. मुलीलाही तो आजार होऊ नये, या भीतीपोटी ती संध्याला शरदसोबत लग्न करण्यास विरोध करीत होती. दोन्ही आरोपी सौंसर येथील वंजारा माता मंदिरात लग्न केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागले.
ओढत आणला मृतदेह
संगीताचा खून केल्यानंतर मृतदेह घरी सोडल्यास पकडले जाण्याची भीती होती. संध्याने दोन वर्षाच्या मुलाला खोलीत बंद केले. त्यानंतर मृतदेह असलेले पोते ओढत पाचपावली रेल्वे रुळापर्यंत आणून फेकले. तेथून दोघेही इतवारी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि मध्य प्रदेशाकडे रवाना झाले.

Web Title: Mother's blood with the help of a boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.