मुलांच्या काळजीने आईची तगमग
By Admin | Published: May 14, 2017 12:45 AM2017-05-14T00:45:28+5:302017-05-14T00:45:28+5:30
मुलांना चांगले संस्कार, शिक्षण मिळावे, त्यांचे पालनपोषण योग्यप्रकारे व्हावे, असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते.
पुणे : मुलांना चांगले संस्कार, शिक्षण मिळावे, त्यांचे पालनपोषण योग्यप्रकारे व्हावे, असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. मग, त्यासाठी हवे ते करण्याची धडपड सुरू असते; पण वडिलांपेक्षा आईमध्ये ही तगमग अधिक दिसून येते. मुलांच्या काळजीने बेचैन होणाऱ्या आईची ही धावपळ कधीकधी अपेक्षेपेक्षाही अधिक असते. त्यामुळे मुलांसाठी समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा ओढाही वाढू लागला आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे जग जवळ आले असले, तरी आयुष्यातील आनंदाचे क्षण मात्र दूर जाऊ लागल्याचे दिसते. आपापसांतील विसंवाद, वाढती स्पर्धा, नोकरी करणारे आईवडील तसेच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे हा दुरावा वाढत असल्याचे चित्र आहे. यामध्ये आईवडिलांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, हा मुद्दा ठळकपणे समोर येतो. या दुर्लक्षामुळे मुलांप्रती प्रामुख्याने आईला वाटणाऱ्या काळजीत भरच पडली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मुलांचे शिक्षण आणि करिअरच्याबाबतीत ही काळजी अधिक असल्याचे समुपदेशक व मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. तसेच, विसंवाद वाढू लागल्याने असे घडू लागल्याचेही त्यांनी नमूद केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सविता देशपांडे म्हणाल्या, मुलांकडे कामाच्या व़्यस्ततेमुळे दुर्लक्ष होत असल्याचे आईवडीलही मान्य करतात. कुटुंबात आजी-आजोबा नसल्याने त्यांच्यावर लक्षही कुणाचे नसते. दिवसभर ते काय करतात, कुणासोबत असतात, हेही कळत नाही. विसंवाद वाढल्यानेही बरेच प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यातून मग मुलांची काळजीही वाढू लागली आहे. माझ्याकडे येणाऱ्या पालकांमध्ये आई-मुलांना घेऊन येत असल्याचे प्रमाण अधिक आहे. समुपदेशक हा आजच्या काळात आई व पाल्य यांमधील महत्त्वाचा दुवा ठरतो आहे. विविध वयोगटातील मुलांना त्यांची आई घेऊन येते. या प्रत्येक वयोगटातील मुलांच्या आईच्या समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. ही असुरक्षितता कुठून आली, याचा शोध घेतला तर एक गोष्ट लक्षात येईल की, पालकांचे दिवसभराचे व्यस्त वेळापत्रक. याचा अर्थ असा नाही की, पालकांनी चोवीस तास मुलांसाठी द्यावा. त्याचा संदर्भ ठरवत आपल्या मुलांशी फक्त दिवसातला अर्धा तास जरी मनमोकळा संवाद साधला, तरी ही काळजी निश्चित कमी होईल, असे मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक मेघा खरे-पालकर यांनी सांगितले.
>एकेरी मातृत्वाचा
आनंद द्विगुणित
पुणे : मातृत्व हा महिलेला मिळालेला अनमोल निसर्ग दागिना आहे. याने स्त्रीजीवनास पूर्णत्व प्राप्त होते. त्यामुळे मातृत्वाचा आनंद अनुभवणे ही प्रत्येक महिलेची इच्छा असते; परंतु हा आनंद अविवाहित, विधवा, घटस्फोटित महिलांना मिळवावा वाटणं यातं गैर काहीच नाही. साहजिकच यातून त्यांचा कल दत्तक मूल घेण्याकडे जातो म्हणजेच एकेरी पालकत्व स्वीकारणे. हे प्रमाण आज दहा टक्के इतके असले, तरी समाजात अशा मातृत्वाचा आनंद लुटणाऱ्या व त्यास सक्षमपणे न्याय देणाऱ्या महिलांचा हा पर्याय व निर्णय चुकीचा नक्कीच नाही, हे लक्षात येते.
भारतामध्येही एकेरी पालकत्व मोहिमेचे वारे वाहू लागले आहे. परदेशात यापूर्वीच ही मोहीम चांगलीच प्रसिद्ध व सहज स्वीकारली गेली आहे; पण सुश्मिता सेनसारख्या स्टारडम असलेल्या अभिनेत्रीने २००० मध्ये एका मुलीला दत्तक घेत एकेरी पालकत्वाच्या स्वीकाराने भारतामध्ये परिवर्तनाच्या दिशेने टाकलेल्या प्रथम पावलाने ही बाब प्रकाशझोतात आली. करियर प्राधान्यामुळे हल्ली महिला लग्नास उशीर करतात किंवा कुठल्याही विचारसरणीचे बंधन न स्वीकारण्याच्या निर्णयामुळे लग्न हा पर्याय टाळला जातो; पण वयाच्या एका ठराविक टप्प्यांवर मनाला नकळत मातृत्वाची चाहूल लागते; पण त्याही वेळी लग्न न करता मातृत्व घेण्याकडे काही महिलांचा ओढा असतो. भारतीय समाजसेवा केंद्राच्या वर्षा भागवत म्हणाल्या, बदलत्या काळाची चालीरीती जीवनशैली निश्चितच नवनवीन संकल्पनांची निर्मिती करणारी असणार आहे. परिवर्तनाच्या या प्रवाहात आपण कितीकाळ जुन्या विचारांना धरून बसणार आहोत. एकेरी पालकत्व ही संकल्पना भविष्यात जास्त प्रचलित झाली, तर आश्चर्य वाटायला नको. या एकेरी पालकत्वाचा हक्क बजावणाऱ्यांमध्ये घटस्फोटित महिलांचे प्रमाणही बरेच आहे. उमेदीच्या वयात मित्र-मैत्रिणी, कुटुंब यांच्या वर्दळीत आयुष्य झटकन पुढे सरकत जाते; पण काही काळानंतर येणाऱ्या एकटेपणाने रिकामं आयुष्य व्यतीत करणं एकप्रकारे मोठं आव्हान होते. या वेळी आधारवडाचा विचार दत्तकत्वाकडे जाण्यास प्रवृत्त करतो.
कुमार वयातील मुलासंबंधी आईचे सर्वसाधारण प्रश्न माझा मुलगा खूूप अल्लड, ओव्हर अॅक्टिव्ह, प्रचंड झोपाळू, अभ्यासाबाबत निष्काळजी, वाचलेलं वेळेवर आठवत नाही, अशा स्वरूपातील असतात; तसेच पौगंडावस्थेतील मुलांच्याविषयी बोलताना आई अतिशय हळव्या व काळजीवह झालेल्या दिसतात. काही आई वेळेआधी तर काही वेळेनंतर जागरूक होताना पाहायला मिळतात; पण या वयातल्या मुलांचे सोशल मीडियामुळे पोर्नोग्राफीकडे सहज वळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. शैक्षणिक समस्यांपेक्षा या गोष्टी जास्त डोके वर काढू लागल्या आहेत. नात्यांमध्ये विश्वास, मैत्रीपूर्णसंबंध यांद्वारे संवादाचा पूल मजबूत उभारणे फार गरजेचे आहे.
- डॉ. सविता देशपांडे,
मानसोपचार तज्ज्ञ
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्वत:सह इतरांना समजावून घेण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. माझ्याकडे येणाऱ्या महिलांना अगदी क्षुल्लक प्रश्न पडलेला असतो की, मी मुलांना कसे रागावू, त्यांना शिस्त कशी लावायची. वे़ळप्रसंगी रागवायला हवेच. तसेच, मुलांना चांगले चांगले संस्कार दिले असतील, तर बाहेरच्या या जगात आपला मुलगा सुरक्षित राहील व त्याचे वर्तन कुठेही बदलणार नाही, याची खात्री हवी. यातून आजची आई सुरक्षित होण्यास खूप मदत होईल. सध्याच्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, यांच्यासमोर चांगले आदर्श नाहीत. ते जर आईने निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर खूप समस्या संपतील.
- मेघा खरे-पालकर,
मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक
काहीवेळा एकेरी पालकत्वाचा आनंद घेण्याच्या हेतूने अविवाहित व घटस्फोटित महिलांचे प्रमाण वाढत आहे. यातही घटस्फोटित महिला जास्त आढळतात. याचे अंदाजे प्रमाण आजमितीला दहा टक्के इतके असून, भविष्यात वाढण्याचीही चिन्ह आहे; पण हा प्रकार वरवरचा नसून खूप जोखमीचा आहे. पालक व्यक्तीचं आर्थिक स्थैैर्य, त्या व्यक्तीनंतर मुलाची जबाबदारी घेणारी कुणी व्यक्ती, सामाजिक उपकाराची त्यात भावना नसावी, हा निर्णय घेताना या काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- वर्षा भागवत,
भारतीय समाजसेवा केंद्र
महाराष्ट्रात महिलांनी दत्तक मूल घेऊन स्वत:त्याचं पालनपोषण करणे ही बाब मध्यमवर्गीय अविवाहित, विधवा, घटस्फोटित स्त्रीवर्गात हे प्रमाण कमी स्वरूपात पाहायला मिळते. कारण, महिला कामावर गेल्यानंतर त्या मुलांना सांभाळणारी व्यवस्था नाही. ही व्यवस्था सक्षमपणे निर्माण केली गेली, तर ही संख्या वाढण्यास मदत होईल. उच्चभ्रू वर्गामध्ये मात्र एकेरी पालकत्व स्वीकारले जात आहे. कारण, त्यांच्याकडे मुलांच्या संगोपनासाठी भरपूर माणसं कार्यरत असतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही व त्यांना ही कर्तव्य बजावता येत नाही. त्यांच्यासाठी ही काही व्यवस्था अंमलात येणे गरजेचे आहे. त्यामुळे या मुलांना एखाद्या अनाथालयापेक्षा हक्काचे घर व संस्कार मिळाले तर एक उत्तम नागरिक तयार करण्यास मदत होईल.
- सुवर्णा पवार, सहायक आयुक्त, महिला व बालविकास विभाग.