भाचीच्या लग्नासाठी आईने केला पोटच्या मुलीचा सौदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 01:30 AM2016-08-21T01:30:40+5:302016-08-21T08:14:22+5:30

भाचीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पैसे उभारण्यासाठी पोटच्या मुलीचा देहविक्रीसाठी सौदा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार लाख २५ हजारांत मुलीचा सौदा झाला

Mother's daughter deal for niece's marriage! | भाचीच्या लग्नासाठी आईने केला पोटच्या मुलीचा सौदा!

भाचीच्या लग्नासाठी आईने केला पोटच्या मुलीचा सौदा!

googlenewsNext

ठाणे : भाचीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पैसे उभारण्यासाठी पोटच्या मुलीचा देहविक्रीसाठी सौदा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार लाख २५ हजारांत मुलीचा सौदा झाला होता. आगाऊ रक्कम घेताना मुंबईतील निष्ठूर आईला ठाणे पोलिसांनी अटक केली.
रुक्साना (३२) असे अटक झालेल्या महिलेचे नाव असून ती मुंबईत गोवंडी येथे राहते. रुक्सानाला पहिल्या पतीपासून झालेली ही १६ वर्षीय मुलगी आहे. तिचे शालेय शिक्षण हे पाचगणी येथे झाले. रुक्सानाचे तिसरे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात आहे. तिची बहीणही तिच्या कुटुंबासह गोवंडीत राहत असून तिची पाणीपुरीची गाडी आहे.
रुक्सानाच्या बहिणीच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. याचदरम्यान, रुक्सानाने आपल्या १६ वर्षीय मुलीला देहविक्री करण्यास राजी करून तिला देहविक्री व्यवसायात ढकलण्याचा निश्चय केला. त्यानुसार, तिने तिची ५ लाखांपासून बोली सुरू केली. मात्र, तडजोडीअंती हा सौदा ४ लाख २५ हजार रुपयांवर ठरला होता. आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार रुपये घेतल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते.
ठाणे गुन्हे शाखेच्या महिला व्यापार प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना पोटच्या मुलीच्या विक्रीसाठी मुंबईतील महिला ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, लुईसवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. रुक्सानाविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावर्षी अशाप्रकारे राबोडी पोलीस ठाण्यात एका आईने पोटच्या मुलीला विक्रीस काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mother's daughter deal for niece's marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.