मुलीचे तीनदा लग्न मोडल्याने आईची आत्महत्या
By admin | Published: February 6, 2017 09:03 PM2017-02-06T21:03:22+5:302017-02-07T09:06:42+5:30
मुलीची छेड काढून तिचे ठरलेले लग्न मोडल्याने मुलीच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 6 - एकतर्फी प्रेम प्रकरणातून ऐतवडे-खुर्द (ता. वाळवा) येथील तरुणाने खटाव (ता. पलूस) येथील मुलीची छेड काढून तिचे ठरलेले लग्न मोडल्याने मुलीच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली. शोभा सुरेश नागावे-पाटील (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. खटाव येथे सोमवारी पहाटे ही घटना घडली. मुलीची तिच्या भावी सासरच्या मंडळींना तरुणीविषयी बदनामीकारक माहिती देऊन या तरुणाने तब्बल तीन वेळा लग्न मोडल्याने तिच्या आईने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली.
शोभा नागावे-पाटील यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या मुलगा आणि मुलीसोबत खटावमध्ये राहत होत्या. मुलीला शिक्षणासाठी त्यांनी ऐतवडे-खुर्द येथे स्वत:च्या भावाकडे पाठविले होते. गेल्या दोन वर्षांपासून मुलगी मामाकडे राहते. याच गावातील एक तरुण दोन वर्षांपासून एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीची छेड काढत होता. रस्त्यावर जाता-येता तिला त्रास द्यायचा. मुलीने अनेकदा त्याला समजावून सांगितले. पण त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. मुलीने हा प्रकार आई व मामाला सांगितला. आईने तरुणाला हात जोडून मुलीच्या मागे लागू नको, अशी विनंती केली. पण तरीही त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. गतवर्षी मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्याविरुद्ध पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज केला होता. पोलिसांनी त्यास बोलावून ताकीद दिली. तसेच येथून पुढे मुलीची छेड काढणार नाही, असे त्याच्याकडून लेखी लिहूनही घेतले होते.
गेल्या सहा महिन्यापासून मुलीचे लग्न करण्यासाठी आईचे व मामाचे प्रयत्न सुरू होते. तिला चांगली स्थळेही येत होती. पहिले स्थळ पसंत पडले होते. साखरपुडाही झाला होता. ऐतवर्डे-खुर्दच्या या तरुणास हा प्रकार समजताच त्याने मुलीच्या भावी सासरच्या लोकांची भेट घेऊन मुलीचे वर्तन चांगले नाही, असे सांगून तिची बदनामी होईल, अशी माहिती दिली. त्यामुळे हे लग्न मोडले. काही दिवसांनंतर मुलीस दुसरे स्थळ आले. त्यावेळी तरुणाने तिचे लग्न मोडले. या प्रकारानंतर मुलीच्या आईने तरुणाची भेट घेऊन त्याच्या पाया पडून का आम्हाला त्रास देत आहे, अशी विचारणा केली होती. गेल्या आठवड्यात मुलीचे तिसऱ्यांदा लग्न ठरले. साखरपुडा व याद्याही झाल्या होत्या. पुन्हा या तरुणाने मुलीची बदनामी करून लग्न मोडले. त्यामुळे आईला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
विष प्राशन केले
गेल्या दोन दिवसांपासून शोभा नागावे-पाटील नाराज होत्या. यातून त्यांनी सोमवारी पहाटे विष प्राशन केले होते. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. विच्छेदन तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गुन्हा दाखल होणार?
आत्महत्येबद्दल नातेवाईकांनी पोलिसांना सर्व माहिती दिली आहे. संशयित तरुणाचे नावही सांगितले आहे. पोलिसांनी तशी कच्ची नोंद करून घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भिलवडी पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता.