दोन चिमुकल्या मुलींसह मातेची आत्महत्या
By admin | Published: May 2, 2017 09:46 PM2017-05-02T21:46:24+5:302017-05-02T21:46:35+5:30
दोन चिमुकल्या मुलींना गळा दाबून मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 2 - सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका २६ वर्षीय महिलेने दोन चिमुकल्या मुलींना गळा दाबून मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. दोन्ही मुलीच झाल्याने विवाहितेला सासरची मंडळी त्रास देत असल्याने तिला आपली जीवनयात्रा संपविण्याची वेळ आल्याची तक्रार तिच्या माहेरच्यांनी दिली आहे.
सवना येथील आरती प्रवीण नायक (२६) हिचा विवाह मागील चार- पाच वर्षांपूर्वी सवना येथील प्रवीण नागोराव नायक यांच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. सवना येथे १ मे रोजी संत बैरागी बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाचे आयोजन होते. त्यानिमित्त गावातील नागरिक व इतर सर्व जण महाप्रसादाकरिता गेले होते. मयत आरती प्रवीण नायक यांची सासू-सासरे आणि पती हे सर्व तेथेच गेले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास महाप्रसाद घेतल्यानंतर ते घरी आल्यावर त्यांना घरामध्ये आरतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच घरातील पलंगावर पूर्वी प्रवीण नायक (४) व किरण प्रवीण नायक(२) या दोन्ही मुलींचा मृतदेह दिसून आल्याने घरातील लोकांनी एकच आक्रोश केल्याने जवळपासच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
या घटनेची माहिती गोरेगाव व कन्हेरगाव चौकीत मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे, टी. के. वंजारे, सुनील खिल्लारे, मोहन धाबे, भूमिराज कुंबरेकर, अनिल येडे, अमोल पठाडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी आरती नायक हिचा मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत व दोन्ही चिमुकल्या मुली पलंगावर मृत अवस्थेत दिसून आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांना मिळताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांना घटनास्थळी रवाना केले. भोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी २ मे रोजी विवाहितेच्या काकाने गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यात पुतणी आरतीला सासरच्या मंडळीकडून त्रास सुरू होता, असे म्हटले. त्यातच तिला दोन्ही मुलीच असल्याने त्यांच्या लग्नाचा खर्च काय तुझा काका देणार का? असे म्हणून वारंवार मारहाण केली जात होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने याबाबत गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली. यात नवरा प्रवीण नायक, सासरा नागोराव नायक, सासू सुनीता, नणंद ज्योती ऊर्फ सीमा देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.