तरुण मुलासाठी आईची धडपड
By admin | Published: February 3, 2017 01:45 AM2017-02-03T01:45:33+5:302017-02-03T01:45:33+5:30
पतीच्या निधनानंतर तिला मुलाचाच आधार होता. बऱ्याच धडपडीनंतर दोन वर्षापूर्वी त्याला वडिलांच्या जागेवर एसटी महामंडळात नोकरी मिळाली. आता सर्व काही सुरळीत होत
नागपूर : पतीच्या निधनानंतर तिला मुलाचाच आधार होता. बऱ्याच धडपडीनंतर दोन वर्षापूर्वी त्याला वडिलांच्या जागेवर एसटी महामंडळात नोकरी मिळाली. आता सर्व काही सुरळीत होत असताना नियतीने मोठा आघात या मायलेकावर केला. पोटच्या तरुण मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता सर्व संपले या विचाराने तो पुरता कोलमडला.
आपले डोळे पुसत ती मात्र खंबीरपणे उभी झाली. स्वत:ची किडनी दान करण्याचे तिने ठरविले. डॉक्टरांनीही तसा होकार दिला. मात्र यातही आर्थिक परिस्थिती आडवी आली. आता प्रत्यारोपणाच्या खर्चासाठी आई अविरत धडपडत आहे.
अयोध्यानगरच्या शिर्डीनगर, साई मंदिराजवळ राहणाऱ्या धर्मेंद्र रवींद्र मन्ने या २९ वर्षाच्या तरुणावर ओढवलेले हे संकट आणि तो सुखरूप जगावा म्हणून धडपडणारी त्याची आई चंद्रकला मन्ने यांची ही गोष्ट. एसटी महामंडळात काम करणाऱ्या पतीचा दहा वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या फंडातील काही लाख रुपये त्यांना मिळाले. मुलीच्या लग्नात त्यातील बराचसा पैसा खर्च झाला. काही पैसा त्यांनी मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी खर्च केला. या प्रयत्नानंतर धर्मेंद्रला दोन वर्षापूर्वी नोकरी मिळाली. चार महिन्यापूर्वी डॉक्टरांनी धर्मेंद्रच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे सांगितले. सध्या धंतोलीतील श्रावण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.
अशा परिस्थितीत आई खंबीरपणे उभी झाली. त्यांनी डॉ. प्रकाश खेतान यांची भेट घेऊन स्वत:ची किडनी मुलाला देण्याचा निर्णय सांगितला. डॉक्टरांनीही त्यांच्या सर्व चाचण्या करून प्रत्यारोपण करणे शक्य असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यारोपणासाठी ७.५० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. कुणीतरी मदत करावी ही आशा बाळगून त्यांनी लोकमत कार्यालयात धाव घेतली.
समाजभान जपणाऱ्यांनी एका आईची आर्त हाक ऐकावी ही अपेक्षा त्यांना आहे. ज्यांना सढळ हाताने मदत करायची आहे त्यांनी धर्मेंद्र मन्ने यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ३३४२१२२४२०३(आयएफसीआयकोड : एसबीआयएन ००००६५) या खात्यावर मदत राशी जमा करावी असे आवाहन केले आहे.(प्रतिनिधी)