कर्जफेडीसाठी धमकी हे आत्महत्येस प्रवृत्त करणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 05:23 AM2017-04-03T05:23:06+5:302017-04-03T05:23:06+5:30
कर्जदारास कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावणे, त्यास मारहाण करणे आणि चारचौघांच्या देखत अपमानित करणे अशा प्रकारची कृती त्या कर्जदाराच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरू शकते
मुंबई : कर्जदारास कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावणे, त्यास मारहाण करणे आणि चारचौघांच्या देखत अपमानित करणे अशा प्रकारची कृती त्या कर्जदाराच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरू शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.
मुंबईतील विठ्ठल नगर, मुलुंड (प.) येथील जागृती सोसायटीमधील गुरुनाथ गवळी आणि संगिता गवळी या सावकार दाम्पत्याने त्यांच्याविरुद्ध दाखल केल्या गेलेल्या आत्महत्येस प्रवत्त करण्याखेरीज अन्य गुन्ह्याच्या खटल्यातून आरोपमुक्त करून घेण्यासाठी केलेली याचिका फेटाळताना न्या. ए. एम. बदर यांनी हा निकाल दिला. आरोपमुक्तीसाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे आरोपी दाम्पत्य उच्च न्यायालयात आले होते.
जागृती सोसायटीच्या इमारत क्र. ११ मध्ये राहणारा उमेश बोंबले रस्त्यावर क्रोकरी विक्रीचा धंदा करण्याखेरीज भिशीही चालवायचा. या भिशीचा व्यवसाय आतबट्ट्यात गेल्यावर त्याने शेजारच्याच इमारतीत सावकारी पेढी असलेल्या गवळी दाम्पत्याकडून १९ लाख रुपये हातकर्जाऊ घेतले होते. या उमेश बोंबले याने २८ सप्टेंबर २०१४ रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यासंदर्भात पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत गवळी यांनी कर्जवसुलीसाठी केलेल्या छळाला कंटाळून उमेशने आत्महत्या केल्याचे त्याची पत्नी सुनिता हिने म्हटले होते. त्यावरून गवळी दाम्पत्यावर खटला दाखल केला गेला.
सुनिताची फिर्याद आणि पोलिसांनी केलेला तपास याचा आढावा घेऊन न्या. बदर यांनी म्हटले की, आरोप निश्चित करणे किंवा आरोपीस आरोपमुक्त करण्याच्या टप्प्याला त्याच्याविरुद्धच्या आरोपांना दोषी ठरवून शिक्षा देण्याइतके सबळ पुराव्याचे पाठबळ असण्याची गरज नसते. आरोप केलेली कृत्ये आरोपीने केल्याची शक्यता त्यावरून दिसत असणेही त्यासाठी पुरेसे दिसते. सुनिताच्या फिर्यादीवरून याची पूर्तता होत असल्याने आरोपींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून आरोपमुक्त करता येणार नाही.
या सुनावणीत आरोपी गवळींसाठी अॅड. अनिल गोरे, सरकारतर्फे सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर एस. व्ही. गावंड यांनी तर फिर्यादी सुनितासाठी अॅड. संदिप सिंग यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)
>घर नावावर करण्याचा तगादा
सुनिता हिने केलेल्या फिर्यादीचा हवाला देत न्या. बदर यांनी म्हटले की, कर्जफेडीसाठी उमेशने त्याचे राहते घर आपल्या नावावर करावे यासाठी गुरुनाथ गवळी रात्री अपरात्री त्याच्या घरी जाऊन त्यास धमकावत असे, असे दिसते.
घरी जाऊन आणि भर रस्त्यातही त्याने उमेशला मारहाण केल्याचे दिसते. असे अपमानित जीणे जगण्यापेक्षा आयुष्य संपविण्याचा विचार उमेशच्या मनात येणे हे मानवी स्वभावाला धरूनच आहे.