मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स

By Admin | Published: September 10, 2015 03:41 AM2015-09-10T03:41:30+5:302015-09-10T12:32:36+5:30

अपघातग्रस्तांना पहिल्या १० मिनिटांत उपचार मिळावेत, यासाठी मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिली.

Motor Bike Ambulance in Mumbai | मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स

मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स

googlenewsNext

मुंबई : अपघातग्रस्तांना पहिल्या १० मिनिटांत उपचार मिळावेत, यासाठी मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिली. त्यासाठी थेट ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे.
आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि इंग्लडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बुधवारी राज्य सरकार आणि ब्रिटनच्या आरोग्यसेवा यंत्रणेत आरोग्यविषयक सामंजस्य करार झाला. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले की, अपघात व आपत्तीतील जखमींवर उपचारासाठी पहिली १० मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. या कालावधीत उपचार मिळावेत, यासाठी मुंबईत पुढील वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर मोटारबाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्यसेवा दर्जेदार करण्यासाठी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, परिचारिका, डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमही ब्रिटन सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात १०८ क्रमांकाद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येते. मात्र मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी अपघातस्थळी रुग्णवाहिका पोचण्यास अडचणी येतात. त्यामुळे दुर्घटनेतील जखमींवर ‘गोल्डन अवर’पेक्षा ‘प्लॅटिनम टेन मिनिट’ वेळेत उपचार झाले, तर जीवदान मिळू शकते. त्यामुळेच इंग्लडच्या सहकार्याने सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेली मोटार बाइक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत प्रायोगित तत्त्वावर १० ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येईल. या माध्यमातून जखमींना जवळचे रुग्णालय, रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.

कशी असेल सेवा ?
सामंजस्य कराराअंतर्गत राज्याला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्याकामी इंग्लंडच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सहकार्य मिळणार
रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणार
डॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण देणार
ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार

Web Title: Motor Bike Ambulance in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.