मोटर वाहन नोंदणी महागली

By admin | Published: July 4, 2017 06:02 AM2017-07-04T06:02:32+5:302017-07-04T06:02:32+5:30

राज्यात गेल्या १ जुलैपासून जकात आणि एलबीटी हे कर रद्द झाल्यामुळे, निर्माण होणारी महसुलाची हानी टाळण्यासाठी वाहन नोंदणी करताना

Motor Vehicle Registration Expenses | मोटर वाहन नोंदणी महागली

मोटर वाहन नोंदणी महागली

Next

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेल्या १ जुलैपासून जकात आणि एलबीटी हे कर रद्द झाल्यामुळे, निर्माण होणारी महसुलाची हानी टाळण्यासाठी वाहन नोंदणी करताना एकरकमी आकारण्यात येणाऱ्या मोटार वाहन करामध्ये, सर्वसाधारणपणे २ टक्के वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्वच वाहनांसाठी उच्चतम कर मर्यादा २० लाख रुपये इतकी ठेवण्यासदेखील मान्यता देण्यात आली.
जकात, एलबीटी हे कर रद्द होऊन राज्य शासनाचे महसुली उत्पन्न कमी होणार असून, ही तूट भरून काढावी लागणार आहे. उत्पन्न वाढविण्याची उपाययोजना म्हणून मोटारवाहन करांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी, दुचाकी आणि तीनचाकीवरील कराचे प्रमाण ८ ते १० टक्के दरम्यान होते. त्यामध्ये वाढ होऊन १० ते १२ टक्के कर लागू होणार आहे. पेट्रोल इंधन आधारित मोटार कारवरील कर ९ ते ११ टक्के या दरम्यान होता, तर आता ११ ते १३ टक्के कर लावण्यात येणार आहे. डिझेल इंधन आधारित मोटार कारवरील कर ११ टक्के ते १३ टक्के या दरम्यान होता. त्यावर आता १३ ते १५ टक्के याप्रमाणे कर लावण्यात येणार आहे.
सी.एन.जी. अथवा एल.पी.जी. इंधन आधारित मोटार कारवरील कर ५ ते ७ टक्के या दरम्यान होता. त्यामध्ये वाढ होऊन ७ ते ९ टक्के कर लावण्यात येणार आहे.

उच्चतम कर मर्यादा २० लाख रुपये

जास्त किंमत असणारी वाहने राज्याबाहेर नोंदणी करून, ती राज्यात वापरली जातात. यामुळे राज्य शासनाच्या महसुलाची हानी होते.
हे प्रकार टाळण्यासाठी सर्वच वाहनांसाठी मोटार वाहन कराची उच्चतम कर मर्यादा २० लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Motor Vehicle Registration Expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.