मोटरमन, गार्डची सुरक्षा वा-यावरच
By admin | Published: October 6, 2014 05:05 AM2014-10-06T05:05:30+5:302014-10-06T05:05:30+5:30
एखादी ट्रेन लेट झाल्यास मोटरमन आणि गार्डला होणारी मारहाण पाहता आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) आणि जीआरपीकडून त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार होती
मुंबई : एखादी ट्रेन लेट झाल्यास मोटरमन आणि गार्डला होणारी मारहाण पाहता आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) आणि जीआरपीकडून त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार होती. मात्र नाही पोलिसांचा वॉच, नाही वॉकीटॉकी असेच चित्र सध्या असून, अजूनही मोटरमन आणि गार्डची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
लोकल उशिराने धावल्यास किंवा सुटल्यास तसेच अपघात झाल्यास मोटरमन आणि गार्डला जबाबदार धरून त्यांना मारहाण केली जाते. अशामुळे मोटरमन किंवा गार्ड हे आंदोलनाचे हत्यार उपसतात आणि मग लोकल सेवेचा बोजवारा उडतो. रेल्वे कर्मचाऱ्यांना होत असलेल्या अशा मारहाणीमुळे सुरक्षेचे उपाय म्हणून लोकल टे्रन आणि एक्स्प्रेसमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस आणि सुरक्षा बल जवानांचा मोबाइल क्रमांक, बक्कल क्रमांक, मोटरमन-गार्ड यांना द्यावा, असे रेल्वेने पोलिसांना सुचविले. तशा आशयाचे पत्र रेल्वेने रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना पाठवले होते. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन-गार्ड यांच्या मदतीसाठी सुरक्षा बल आणि पोलिसांचे मोबाइल क्रमांक आणि वॉकीटॉकी यांसारख्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून मदत मिळवता येणे शक्य होेणार होते. रात्री ८ ते सकाळी ५ या दरम्यान महिला डब्यातील पोलिसांचा क्रमांक मोटरमन आणि गार्ड यांच्याकडे नोंद करण्याच्या सूचनाही देणार होत्या. मात्र तसे न झाल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
मोटरमन आणि गार्डला मारहाण करू नये, हा एक गुन्हा मानला जाईल, अशा पोस्टर्सद्वारे प्रवाशांमध्ये नुसतीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मोटरमन आणि गार्डची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे यावरून
दिसते. (प्रतिनिधी)