मुंबईच्या विकासासाठी सामंजस्य करार
By admin | Published: July 11, 2017 02:46 AM2017-07-11T02:46:16+5:302017-07-11T02:46:16+5:30
मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन संस्थांकडून विविध क्षेत्रांत विकासासाठी प्रकल्प व उपक्रम राबविले जाणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन कौशल्याच्या संवर्धनावर तसेच महानगर क्षेत्रातील स्वस्त खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल. अध्यापन कौशल्य व मिळणारे शिक्षण यांत सुधारणा करण्यासाठी कौशल्य विकास आणि भाषा प्रावीण्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले जातील. हे कार्यक्रम प्रत्यक्ष व डिजिटल अशा दोन्ही स्वरूपांत चालवले जातील, त्यामध्ये सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश केला जाईल, अशी माहिती ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात आली आहे. भारतात येणाऱ्या पर्यटकांची मुंबई महानगर क्षेत्र हीच पहिली पसंत ठरावी, यासाठी क्षेत्रातील रचनात्मक आणि सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
‘मिक्स द सिटी मुंबई’ या प्रकल्पाद्वारे मुंबईतील वैविध्यपूर्ण संगीताला जागतिक श्रोते मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, या उपक्रमांतर्गत शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्यामध्ये नागरिकांना सहभागी होता येणार आहे.