मोडी लिपीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न

By Admin | Published: March 17, 2017 04:45 PM2017-03-17T16:45:16+5:302017-03-17T16:45:16+5:30

टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडी लिपीच्या चांगलीच प्रेमात आहे. तिने तिच्या दुचाकीवर शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीमधील पत्रच प्रिंट करुन घेतले आहे.

Mouri's unique effort to promote modi script | मोडी लिपीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न

मोडी लिपीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 -  टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडी लिपीच्या चांगलीच प्रेमात आहे. तिने तिच्या दुचाकीवर शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीमधील पत्रच प्रिंट करुन घेतले आहे. हेल्मेटवरही 'मोडी संवर्धनासाठी प्रयत्न', असा संदेश दिला असून नागरिक उत्सुकतेने तिची या उपक्रमाबाबत चौकशी करताना दिसत आहेत.
श्रुती गणेश गावडे (वय २१, चिंचवड)असे या युवतीचे नाव आहे. डी.वाय.पाटील महाविद्यालयात ती जाहीरात क्षेत्राच्या अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. टायपोग्राफीचा अभ्यास या विषयात करताना तिची मोडी लिपीशी ओळख झाली. भारत इतिहास संशोधक मंडळात चालणा-या मोडी प्रशिक्षण वर्गात तिने मोडीच्या लेखन वाचनाचा सराव केला. रोजचा अभ्यास सांभाळून चिंचवडवरुन सदाशिव पेठेत येण्यासाठी तिने कंटाळा केला नाही.
 
मोडीच्या प्रसार प्रचाराचा ध्यास घेऊन तिने तिच्या दुचाकी वाहनावर मोडी अक्षरे छापून घेतली. आगळीच अक्षरे असल्याचे पाहून नागरिक तिच्याकडे आवर्जून चौकशी करतात आणि तिच्या उपक्रमाला शुभेच्छा देतात. अनेक वाहनांमध्ये तिची दुचाकी उठून दिसत असल्याने शेकडो नजरा तिच्या दुचाकीकडे लागलेल्या असतात.उडीदाच्या डाळीपासून तिने मोडी अक्षरे असलेल्या चकल्याही मध्यंतरी तयार केल्या. त्या मुलांना खाऊ म्हणून दिल्या. खाऊचे पदार्थ मोडी लिपीमध्ये तयार केले, तर मोडीचा प्रसार लहान मुलांमध्येही होईल, असे तिला वाटते. मोडी लिपी सामान्यांनाही शिकता यावी यासाठी बाराखडीच्या धर्तीवर मोडीचा कित्ता तयार केला आहे. पुणे विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या अक्षर लेखन स्पर्धेत मोडी लिपीच्या लेखनाबद्दल तिने पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला. 
 
मोडीचा इतिहास लोकांपर्यंत नेणार
श्रुती गावडे म्हणाली, सैराट चित्रपटाच्या कलाकारांचे चित्र गाडीवर लावले गेल्यावर त्याच्या बातम्या झाल्याचे मी पाहिले. खरे तर त्या चित्रपटाने खूप चांगले असे काही समाजाला दिलेले नाही. त्यामुळे मी मोडीच्या प्रसारासाठी, चांगल्या कामासाठी मोडीच्या लिपीची जाहिरात व्हावी, असा विचार केला. मी हातानेच दुचाकीवर अक्षरे लिहिणार होते, पण पाण्यामुळे ती खराब झाली असती हे ओळखून शिवाजी महाराजांचे पत्रच प्रिंट करुन घेतले. मोडीचा प्रसार व्हावा यासाठी आणखी दोन -तीन उपक्रम करणार आहे. मोडीचा इतिहास मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कलाक्षेत्रातूनही मोडीचा प्रसार होऊ शकतो, हे मी माझ्यावरुन दाखवून दिले आहे. मी आमच्या जाहिरातीच्या अभ्यासक्रमात लोकमतच्या अ‍ॅड कँपेनचाच विषय घेतला होता. 
 
उपक्रम अतिशय नवा : मंदार लवाटे
मोडी विषयाचे तज्ज्ञ आणि इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, मोडी ही विस्मरणात जाऊ पाहणारी लिपी होती. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये सुरू केलेल्या मोडी प्रशिक्षण वर्गासाठी दूरवरुन लोक येतात हे पाहिल्यावर मोडीविषयी अजूनही मोठी उत्सुकता असल्याचे दिसून आले. श्रुती गावडे हिने दुचाकीवर मोडीचे पत्र छापण्याचा उपक्रम अतिशय नवा आहे. तिने चकल्या बनविताना मोडी अक्षरांचा वापर केला, हेही नविन आहे. अक्षरांची ओळख लहान मुलांना करुन देण्यासाठी खाद्यपदार्थांचा उपयोज करणे माझ्या आजवर ऐकिवात नाही. 

Web Title: Mouri's unique effort to promote modi script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.