बारामतीवर शोककळा
By admin | Published: May 25, 2015 11:08 PM2015-05-25T23:08:50+5:302015-05-25T23:08:50+5:30
आजची पहाट तिन्ही गावांमधील या युवकांच्या मृत्यूच्या बातमीने सुरू झाली. त्यानंतर या गावांमध्ये कमालीची शांतता पसरली. तिन्ही गावांमधील व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.
बारामती : आजची पहाट तिन्ही गावांमधील या युवकांच्या मृत्यूच्या बातमीने सुरू झाली. त्यानंतर या गावांमध्ये कमालीची शांतता पसरली. तिन्ही गावांमधील व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. चौकाचौकांमध्ये ग्रामस्थ एकत्रित येऊन या अपघाताबाबत चर्चा करीत होते.
शेखर गवळी हा तरुण बारामती खरेदी-विक्री संघाचे संचालक बापूराव गवळी यांचा मुलगा आहे. त्याच्या मागे आई, वडील, दोन बहिणी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने वडील बापूराव यांना रक्तदाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. तसेच हृषीकेश हा येथील राजेंद्र उपहारगृहाचे मालक पोपट गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, लहान बहीण असा परिवार आहे तर अनिल गवळी यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मोठा भाऊ असा परिवार आहे. देऊळगाव रसाळ येथील बारामती खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ यांचा सागर हा मुलगा होता. तर सागर बाळासाहेब रसाळ हा गिरणी व्यावसायिक, शेतकरी बाळासाहेब रसाळ यांचा एकुलता एक मुलगा होता. तो विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. तर अजित रसाळ हा त्याचा सख्खा चुलतभाऊ आहे. त्याचाही अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचा विवाह झाला असून, त्याला मुलगादेखील आहे. त्याचा परिसरात दूध व्यवसाय, शेती व्यवसाय होता. खराडेवाडी येथील नागेश बाळासाहेब खराडे हा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. याशिवाय घरातील शेतीकाम करून कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळण्यासाठी त्याचा पुढाकार होता.(वार्ताहर)
४उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ गावांमधील व्यवहार पूर्ण ठप्प होते. चौकाचौकांत पारावर बसून फक्त अपघात आणि युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या चर्चा सुरू होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच शोककळा पसरल्याचे चित्र होते. काही मृतांच्या घरी या अपघाताबाबत माहिती नव्हती. मृत्यूची बातमी त्या युवकांच्या घरी सांगायची कोणी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. तर नियतीसमोर काय करणार, असा सवाल या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केला.
४तिरुपतीच्या सहलीसाठी नेण्यात आलेली स्कॉर्पिओ खराडवाडी परिसरातील भापकर वस्ती येथील होती. गाडी भाडेतत्त्वावर नेण्यात आली होती. मात्र, या स्कॉर्पिओच्या चालकाबाबत एकाही ग्रामस्थाला
माहिती नव्हती. तिन्ही गावांमधील ग्रामस्थांनी, त्या सातपैकी चार जण चारचाकी वाहनाचे सराईत
चालक होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवत होता, असा प्रश्न ग्रामस्थांनादेखील पडल्याचे चर्चेतून जाणवले.
घरचा आधार गेला...
अपघाताची वार्ता समजल्यापासून आम्हाला अवस्थ वाटू लागले आहे. नागेश आमचा जवळचा मित्र होता. घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे, अशी प्रतिक्रिया परशुराम खराडे, गणेश खराडे, सागर खराडे यांनी व्यक्त केली, तर अपघाताची माहिती समजल्यानंतर ‘अन्नाचा घास पोटात गेला नाही, काय होऊन बसलं, कमी वयात नागेश घरचं सगळं पाहत होता. त्यामुळे त्याचं कौतुक होतं,’ अशी प्रतिक्रिया येथील वयोवृद्ध महिला विमल खराडे यांनी व्यक्त केली.
सुदैवाने बचावला..
अपघातातील ७ तरुणांबरोबर उंडवडी सुपे येथील मोहन गवळी हादेखील जाणार होता. मात्र, ऐनवेळी तो त्यांच्याबरोबर गेला नाही. या दुर्घटनेत गवळी यालादेखील अपघात झाला, असे वृत्त आल्यानंतर काही काळ संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तो बालाजी दर्शनाला गेलाच नाही, असे समजल्यावर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.
तिन्ही गावचे ग्रामस्थ अपघात स्थळाकडे रवाना
तिरुपती देवस्थानच्या दर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिन्ही गावांमधील युवावर्ग मोठ्या प्रमाणात गावांमध्ये एकत्रित आला. तातडीने तिन्ही गावांमधील युवक आंध्र प्रदेशमधील अपघाताच्या ठिकाणी स्वतंत्र वाहनांमधून रवाना झाले आहेत. या युवकांचे मृतदेह सोमवारी रात्री उशिरा गावामध्ये आणण्यात येणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.