मुख, जीभ आणि स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर
By admin | Published: February 3, 2017 10:50 PM2017-02-03T22:50:19+5:302017-02-03T22:50:19+5:30
भारतात इतर शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - भारतात इतर शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: मुख, जीभ व स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. नागपुरात प्रत्येकी एक लाख लोकांमध्ये १०७ महिला तर ९७ पुरुष कॅन्सरच्या विळख्यात आहे. यातील अनेक रुग्ण मृत्युपंथाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.
भारत सरकारने २०१४ मध्ये सादर केलेल्या हेल्थ प्रोफाईल-२०१३च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी कॅन्सरचे १० ते १२ लाख नवे रुग्ण समोर येतात. यातील साधारण सात ते आठ रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. महिलांमध्ये स्तनाचा तर पुरुषांमध्ये मुख व जिभेच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे व मुंबई लोकसंख्येच्या प्रमाणात नागपूर येथे कॅन्सरचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकट्या राजधानीत २२ हजार ८६४ कॅन्सर रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर उपराजधानीत दर लाखात २२९ महिला, तर १८२ पुरुष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- १८ लोकांमध्ये एकाला कॅन्सर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, नाागपुरात शून्य ते ७४ वयोगटातील १८ स्त्री-पुरुषांमध्ये एकाला कॅन्सर असल्याचे आढळून येते. शून्य ते ६५ हा वयोगट घेतला तर १६ स्त्री-पुरुषांमध्ये एकाला कॅन्सर असल्याचे सामोर येते.
- ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ३२ टक्के
देशात १९८२-८३ मध्ये एकूणच कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता. मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबादमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे.
-डॉ. क्रिष्णा कांबळे