शिमग्याऐवजी शांततेत आंदोलन करा, चंद्रकांत पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:36 PM2018-08-15T13:36:46+5:302018-08-15T13:37:16+5:30
मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
कोल्हापूर : मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील मराठा आंदोलकांना विनंती आहे, की सरकारवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कोणाच्या नावाने शिमगा करू नका, असा टोला महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही मराठा आंदोलनाबद्दल असेच वादग्रस्त विधान केल्याने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. ९ ऑगस्टला झालेल्या आंदोलनावेळी पाटील यांच्यावर अत्यंत बोचरी टीका झाली होती, त्यामुळे मंत्री पाटील यांनी असे प्रत्युतर दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाराणी ताराबाई सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित युवा माहिती दूत उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या चाळीस वर्षांतील सरकारे आरक्षणही देऊ शकले नाही, तसेच ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधाही देऊ शकले नाहीत. परंतु या शासनाने आरक्षण देण्यास आम्ही बांधिल असल्याचा निर्णय केला. त्याची प्रक्रिया करण्याबरोबरच आरक्षण मिळाल्यानंतर ज्या सवलती मिळतात, त्या आधीच देता येतील का? म्हणून सरकारने तीन योजना घोषित केल्या. त्यामध्ये कोणत्याही अभ्यासक्रमासाठी निम्मी फी सरकार भरत आहे. गेल्या वर्षी या उपक्रमात २ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची ६५४ कोटी इतकी फी सरकारने भरली आहे. दुसरी योजना दहा लाखांपर्यंतचे कर्ज व्याज सरकार भरत आहे. पुढील पाच वर्षात प्रत्येकी ३ लाख २५ हजार सरकार भरणार आहे. या कर्जाला सरकारने हमी दिल्याने बॅँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायला सुरुवात केली. यातून मराठा तरुणांनी व्यवसाय करावे आणि इतरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. तिसरी योजना म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील शंभर मुले आणि शंभर मुलींचे वसतिगृह सुरू करण्याची आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे. ९२ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात १९ विद्यार्थी येऊन पोहोचले आहेत. १५ आॅगस्टनंतर कॉलेजमधील मुलांची संख्या वाढणार असल्याने या वसतिगृहातील मुलांचीही संख्या वाढेल.
------------------------------
महिन्याभरात मुलींचे वसतिगृह
कोल्हापुरातील मुलांचे वसतिगृह स्थिर झाले की मुलींसाठीही वसतिगृह सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू असून महिन्याभरात हे वसतिगृह सुरू केले जाईल. कालच पुण्यातील वसतिगृह सुरू झाले असून, उर्वरित ठिकाणी इमारतींची कामे सुरू आहेत. येणाऱ्या काळात दहा जिल्ह्यात मराठा समाजातील मुले व मुलींसाठी वसतिगृहे सुरू केली जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
-----------------------------------------
पीएचडी करणा-या मुलांना फेलोशिप
बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्थेची स्थापना केली असून, मराठा समाजातील पीएचडी करणा-या मुलांना फेलोशिप व एमपीएससी व यूपीएससी करणा-या मुलांच्या फीमधील काही भाग ही संस्था उचलणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
---------------------------------------------
मराठा आंदोलकांनी पालकमंत्र्यांची भेट टाळली
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासाठी सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, हर्षल सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर पालकमंत्री पाटील हे स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेत निघाले होते. पालकमंत्री आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून आंदोलक त्यांची भेट टाळून तेथून बाहेर पडले. मराठा आंदोलक येणा-या असल्याने परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.