बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलन : सहा वर्षांनंतरही आंदोलनाच्या जखमा ओल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:43 AM2017-08-09T03:43:53+5:302017-08-09T03:44:02+5:30

मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात आंदोलन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बौर गाव येथे दि. ९ आॅगस्ट २०११ रोजी झाले होते. या आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत.

 Movement Against Bandit Water Cycle: Six years later, the wounds of the movement were over | बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलन : सहा वर्षांनंतरही आंदोलनाच्या जखमा ओल्याच

बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलन : सहा वर्षांनंतरही आंदोलनाच्या जखमा ओल्याच

googlenewsNext

येळसे : मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात आंदोलन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बौर गाव येथे दि. ९ आॅगस्ट २०११ रोजी झाले होते. या आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे तीन निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेला.
आंदोलनामध्ये भाजपा, शिवसेना, आरपीआय हे राजकीय पक्ष सहभागी झाले होते. बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी- चिंचवड महापालिकेत नोकरी मिळाली आहे. बळी पडलेल्या व्यक्तीचे स्मारकाचे काम येळसे येथे पूर्ण झाले आहे. परंतु आंदोलनामध्ये इतर शेतकरी होते. काही शेतकऱ्यांना गोळ्या लागल्याने जखमी व्यक्तींना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत कोणत्याही शासकीय सेवेत रुजू झाले नाहीत.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद जलवाहिनी विरोधात बऊर फाट्याजवळ २०११ ला पुणे मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते.
त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन शेतकºयांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ४७ आंदोलकांना अटक केली होती. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावर अद्यापही सुनावणी सुरू आहेत.
दरम्यान पुण्यातील विधानभवन येथे २००८ मध्ये झालेल्या बैठकीत जलवाहिनी राबविण्याचा निर्णय झाला. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी बंदिस्त जलवाहिनी योजना राबविणारच असा पवित्रा घेतला. शेतकºयांच्या भूमिकेचा विचार न करता मनमानी पद्धतीने १ मे २००८, कामगार दिनाच्या दिवशी या कामाचे भूमिपूजन केले. त्या वेळी तिथे या कामासाठी आणलेले सर्व साहित्य, पोकलेन, जेसीबी, केबिन आदी शेतकºयांनी खोलवर खाली फेकून दिले व पुन्हा आंदोलन व्यापक होऊ लागले. पुन्हा शेतकºयांच्या विरोधात पोलीस बंदोबस्तात १ नोव्हेंबर २००८ मध्ये गहुंजे येथून कामास सुरुवात झाली. परंतु शेतकºयांचा बंद जलवाहिनीला विरोध कायम होता. त्याचाच उद्रेक होऊन ९ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. सध्या हे काम ठप्प असून अपघाताचा धोका वाढला आहे. 

श्रद्धांजली सभेचे आज आयोजन
पवनानगर : मावळ गोळीबारातील शहिदांसाठी श्रद्धांजली सभेचे बुधवारी (दि. ९) सकाळी १०ला पवनानगर, येळसे येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनातील गोळीबारामध्ये येळसे येथील शांताबाई ठाकर, शिवणे येथील मोरेश्वर साठे, तर सडवली येथील श्यामराव तुपे यांचा मृत्यू झाला होता. घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेस आमदार संजय भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे, ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, पांडुरंग ठाकर, सभापती भास्करराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा सुनील शेळके, अलका धानीवले, जिजाबाई पोटफोडे, निकिता घोटकुले, बाळासाहेब घोटकुले, गणेश ठाकर, बबन कालेकर, शिवसनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांवरील लावलेली कलमे
जलवाहिनीच्या आंदोलनात पोलिसांनी शेतकºयांवर गोळीबार केला होता. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०११ यानुसार गुन्हा नोंदविला गेला. भादंवि ३०७, ३५३, ३३२, ३३३, ४२६, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, १२० (ब) व सहक्रिमिनल अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद केली. एखाद्या सराईत आरोपीएवढी कलमे पोलिसांनी शेतकºयांवर लावली होती. हा गुन्हा नियोजनबद्ध असून, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधणे, आरोपींनी रॉकेलचे कॅन, बाटल्या, वाहनांचे टायर कोठून आणले होते. या गुन्ह्यास राजकीय लोकांनी प्रलोभने दाखविली होती का, याचा तपास करण्यासाठी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर १५ हजारांच्या वैयक्तिक जामिनावर सोडले. या प्रकरणात २५० वाहनांची मोडतोड व जाळपोळ केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आठ जणांना अटक करून ३४ जणांची नावे गुन्ह्यात घेऊन १२०० अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता.

असे होते नियोजन
बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातून पात्रालगतच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार असून, दररोज ४३० क्युसेक पाणी सोडण्यात येणार होते. सध्या धरणात ३०५ दशलक्ष (१०.७६ टीएमसी) साठा आहे. यातून नगरपालिकेला ६.५५ टीएमसी पाणी लागणार असून, याला शासनानेही मंजुरी दिली आहे. २०३१ पर्यंत २९ लाख ७ हजार ७५७ लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा करण्याचे नयोजन होते.पवना धरणाच्या बांधकामाला १९६५ला सुरुवात झाली. त्यानंतर १९७२ ला बांधकाम पूर्ण झाले व पाणी साठविण्यास सुरुवात झाली. धरण परिसरातील १९ गावे व वाड्या-वस्त्यावरील सुमारे २३९७ हेक्टर म्हणजे ५९२० एकर जमीन या धरण क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली. यापैकी ४४९४ एकर क्षेत्र पाण्याखाली गेले व उर्वरित म्हणजे १४२६ एकर क्षेत्र पाण्याबाहेर शिल्लक आहे. या भागातील १९ गावांतील १२०३ खातेदारांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये बाधित झाल्या.

असा आहे प्रकल्प

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन २०३१ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन असलेला पवना बंदिस्त जलवाहिनीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २००८ मध्ये महापालिकेने हाती घेतला.
जवाहरलाल नेहरू राष्टÑीय नागरी विकास अभियानांतर्गत केंद्र शासनाचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर झाला. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कोणतीही हमी नाही, शेतीक्षेत्र बाधित होणार असल्याने स्थानिकांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला. बऊर येथे झालेल्या आंदोलनामुळे प्रकल्प वादग्रस्त बनला. शासनाने स्थगिती दिल्याने प्रकल्प रेंगाळला असून सध्या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात.
सध्या महापालिका हद्दीत पवना धरणातूनच पाणीपुरवठा होतो. पवना नदीवर रावेत येथे बंधारा बांधून पंपिंग स्टेशनमध्ये पाणी उचलले जाते. पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर संपूर्ण शहरात पाण्याचे वितरण केले जाते.
पाणीपुरवठा टप्पा १, २ आणि ३ कार्यान्वित करून महापालिका ४५० दशलक्ष लिटर पाण्याचे वितरण करते. या व्यवस्थेत पाण्याची ४० टक्के गळती होते. गळतीचे प्रमाण कमी व्हावे, पंपिंग आणि शुद्धिकरण यंत्रणेवरील खर्चात कपात व्हावी. नैसर्गिक गुरूत्वबलाच्या आधारे स्वच्छ पाणी पाहोचावे. या उद्देशाने बंदीस्त जलवाहिनी योजना हाती घेतली.
१८७ दशलक्ष घनमीटर राखीव पाणीसाठ्यापैकी १३९ दश लक्ष घनमीटर पाणीसाठा उचलण्याची जलसंपदा खात्याची महापालिकेस मुभा आहे.

९ आॅगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनात माझी आई पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाली होती. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल.
- नितीन ठाकर,
शहीद कांताबाई ठाकर याचा मुलगा


जलवाहिनी कायम स्वरूपी बंद होऊन महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून आमच्या कुटुंबावर व शेतकºयांवर होणारा अन्याय थांबवून आम्हाला न्याय मिळवून द्याल. आंदोलनातील शेतकºयांवरील जे खोटे गुन्हे दाखल आहेत, ते मागे घ्यावेत. यातूनच आमच्या कुटुंबीयांना खरा न्याय मिळेल, तरच माझ्या वडिलांना श्रद्धांजली मिळेल.
- अक्षय मोरेश्वर साठे (मोरेश्वर साठे याचा मुलगा)

माझे पती आंदोलनामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये शहीद झाल्यापासून माझ्या कुटुंबाची जी वाताहात झाली होती ती मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळाल्यामुळे थांबली आहे.
- हौसाबाई श्यामराव तुपे
श्यामराव तुपे यांची पत्नी

Web Title:  Movement Against Bandit Water Cycle: Six years later, the wounds of the movement were over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.