शहर एसटी बंदविरोधात आंदोलन
By Admin | Published: September 18, 2016 02:06 AM2016-09-18T02:06:32+5:302016-09-18T02:06:32+5:30
नालासोपारा आगारातील एसटी सेवेचे ९ मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत.
वसई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) नालासोपारा आगारातील एसटी सेवेचे ९ मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत. त्याच्या विरोधात लढा उभारण्यासाठी जनआंदोलन समिती सरसावली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिने निषेध सभा आयोजिली होती.
तोट्याचे कारण देत नालासोपारा आगारातील गास, उमराळे, नाळे, कळंब, भुईगाव, निर्मळ, राजोडी अशा एकूण ९ मार्गांची सेवा बंद केल्याचे एसटीने कळवले आहे. याचबरोबर या मार्गावर महापालिकने परिवहन सेवा सुरू करावी अशी विनंती केली आहे. त्याविरोधात समितीने आंदोलनाची तयारी केली आहे.
या मार्गावरील सेवा नफ्यात असतांना त्या बंद करण्याची गरज नव्हती. या निर्णयाविरोधात तसेच वसईतून लढा उभारण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांना एकत्र आणले जात आहे. शुक्रवारी संध्यकाळी निर्मळ येथे सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात आंदोलनाटी दिशा ठरवण्यात आली. यावेळी एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी, डॉमणिका डाबरे, समीर वर्तक, रुपेश राड्रीग्ज यांच्यासह कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी हजर होते.
या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी चार वाजता नालासोपारा एसटी स्टँडमध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एसटीच्या निर्णाविरोधात आंदोलन करण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
>‘टीम आमची वसई’च्या सूचना
प्रदूषणकारी व त्रासदायक बसेस बंद करुन पालिकेने छोट्या किंवा मोठ्या अधुनिक बसेस आणाव्यात सध्याच्या बसेस जास्त धूर सोडतात. त्याचे ड्रायव्हर फार रफ ड्रायव्हिंग करतात व कंडक्टर प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देतात असा बऱ्याच प्रवाशांना अनुभव आहे. वसई विरार पालिकेच्या बस सकाळी ७ च्या नंतर सुरु होतात आणि रात्री १० नंतर बंद होतात. गावच्या लोकांनी फर्स्ट शिफ्ट, नाईट शिफ्ट करायची कशी? बायका- मुलें येणार जाणार कशी ? महापालिकेचे स्वत:चे बस डेपो ही नाहीत. त्यामुळे बसेस रस्त्यावरच उभ्या राहतात व वाहतूक कोंडी होते. पालिका टु व्हिलर पार्किंगची धड सोय सुद्धा करत नाही. जी आहे ती परवडत नाही आणि खिशाला खार लावून गाड्या पार्किंगमध्ये ठेवल्या तर गाड्या चोरीला जातात. या सर्व मुद्यांवर विचार करून त्यावर तोडगे काढून व अमलात आणूनच एसटीची सेवा बंद करून परिवहन सेवा सुरू करण्याचा विचार पालिकेने करावा अशी सूचना आमची वसई टीमने केली आहे.