सीमावर्ती राज्यात मराठी अकादमी स्थापनेच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 05:53 AM2018-05-27T05:53:26+5:302018-05-27T05:53:26+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बडोदे येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनात गुजरातमध्ये ‘गुजरात मराठी अकादमी’ स्थापन करण्याची मागणी केली होती.
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बडोदे येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनात गुजरातमध्ये ‘गुजरात मराठी अकादमी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. गुजरातसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व छत्तीसगड या सीमावर्ती राज्यांतही या अकादमीची स्थापना करण्याची सूचना या वेळी करण्यात आली होती. त्यानुसार, शासनस्तरावर कार्यवाही सुरू केल्याची माहिती अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.
शासनाच्या मराठी भाषा विभागाने या दोन्ही ठरावांतील मागण्यांच्या अनुषंगाने सीमावर्ती राज्यांशी चर्चा केली आहे. तसेच मराठी अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करावा, असे निर्देश शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांना दिले आहेत. त्याप्रमाणे, १४ मे रोजी ही माहिती शासनाने महामंडळाला पत्र लिहून उपलब्ध करून दिल्याचे जोशी यांनी सांगितले.