‘सैराट’ चित्रपटातील संवादाला महिला दिग्दर्शिकेची हरकत
By admin | Published: May 13, 2016 02:12 AM2016-05-13T02:12:05+5:302016-05-13T02:12:05+5:30
‘सैराट’ चित्रपटात आक्षेपार्ह संवाद असल्याने दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी ते काढून टाकावे आणि अशा संवादांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चित्रपट दिग्दर्शिका प्रणिता पवार यांनी केली आहे
कल्याण : सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटात आक्षेपार्ह संवाद असल्याने दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी ते काढून टाकावे आणि अशा संवादांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चित्रपट दिग्दर्शिका प्रणिता पवार यांनी केली आहे. या प्रकरणी मंजुळे यांना कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिली.
पवार यांच्या भूमिकेला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पवार यांची मागणी रास्त असल्याचे म्हणत आक्षेपार्ह संवाद चित्रपटातून त्वरित वगळावे, असे स्पष्ट केले आहे.
पवार यांची स्वत:ची प्रॉडक्शन संस्था आहे. त्यांनी ‘माझं नाव शिवाजी’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटातील हा संवाद म्हणजे स्त्रियांचा अपमान आहे. त्यामुळे चित्रपटातून संवाद काढण्याची मागणी पवार यांनी केली. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या एम्पॉवर वुमेन्स वेल्फेअर संस्थेकडे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या आशा रसाळ यांच्याकडे धाव घेतली. रसाळ आणि पवार यांनी गुरुवारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे हा मुद्दा मांडला आणि तो त्यांनीही उचलून धरला.
त्यानंतर, मंजुळे यांना संवाद काढण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. तो न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या नोटिशीची प्रत सेन्सॉर बोर्डालाही दिली आहे. (प्रतिनिधी)‘सैराट’ चित्रपटात शिक्षकाच्या तोंडी महिलेचा अवमान करणारे संवाद आहेत. मराठी जनांवर चिखलफेक करणारे संवाद शिक्षकाच्या तोंडी आहेत. आपल्याला एखादा संवाद पटत नसेल, तर तो नाकारण्याचा अधिकार भूमिका करणाऱ्याला असतो.शिक्षकाची भूमिका करणाऱ्या कलावंताने हा संयम पाळलेला नाही. चित्रपटातील या वाक्यावरून ‘मुलगी ही भोगवस्तू असून तिला वापरून सोडून द्या,’ असा संदेश समाजात पसरवला जात आहे.
पवार यांच्या भूमिकेला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पवार यांची मागणी रास्त असल्याचे म्हणत आक्षेपार्ह संवाद चित्रपटातून त्वरित वगळावे, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या एम्पॉवर वुमेन्स वेल्फेअर संस्थेकडे धाव घेतली आहे.