मराठीच्या अभिजात दर्जासाठी प्रसंगी आंदोलन!
By admin | Published: February 4, 2017 01:37 AM2017-02-04T01:37:57+5:302017-02-04T01:37:57+5:30
मराठी भाषेवर इंग्रजीचे सावट पडले आहे. पण, त्याचे आपल्याला काही वाटेनासे झाले आहे. बोलीभाषेतही आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्याने भाषा जीर्ण होते आहे.
मराठी भाषेवर इंग्रजीचे सावट पडले आहे. पण, त्याचे आपल्याला काही वाटेनासे झाले आहे. बोलीभाषेतही आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्याने भाषा जीर्ण होते आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे न्यायासाठी पाहतो आहोत. त्यांनी न्याय दिला तर ठीक; अन्यथा मराठी जनतेला त्यासाठी आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही... साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या भाषणाचा संपादित अंश...
श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती व्हायला हवी. प्रत्येक कलाकृती ही जाणकार रसिकांच्या मिठीसाठी आसुसलेली असते. आपली भाषा, आपले साहित्य आणि आपली संस्कृती यांच्यावर वैैश्विक दाबाने आलेल्या आणि वाढत चाललेल्या इंग्रजी सावटाचे रूप आम्हाला समजत नाही, असे नाही. पण, भौतिक संपन्नतेच्या आणि तज्जन्य सुखवादी कल्पनांच्या आहारी गेलेल्या आमच्या समाजाला त्याचे फारसे काही वाटेनासे झाले आहे. भाषा हे शब्दांच्या माध्यमातून मानवी मनांना जुळवणारे साधन आहे. त्या बोलीभाषेत इंग्रजी शब्दांचा भरणा करून अर्थसंपन्न असलेली बोलीभाषा आज लग्नात घेतलेल्या भरजरी शालूसारखी झालेली आहे. हे जीर्ण झालेले महावस्त्र उंच पोतांचे व्हावे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. समस्त मराठी जनता अनुकूल निर्णयासाठी केंद्र सरकारकडे आपले डोळे लावून बसली आहे. या दर्जाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निकषांसंदर्भातील सर्व पुरावे केंद्र शासनाला कधीच सादर करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीच्या मूल्यांकन समितीने महाराष्ट्र शासनाचा दावा मान्य करून केंद्राकडे अनुकूल शिफारस केली आहे. न्यायशील केंद्र सरकार अपेक्षित न्याय प्रदान करील, अशी मी आशा बाळगतो. यथोचित पुरावे दिल्यानंतर निर्णयात दिरंगाई होत असेल; तर मराठी जनतेला यासंदर्भात आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तथापि, अशी पाळी केंद्र सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, अशी मला आशा वाटते. असा दर्जा मिळणे, हा मराठी भाषेचा जन्मसिद्ध हक्क आहे.
शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ विश्वाविषयी, व्यक्तीविषयी, व्यक्तीसमूहांविषयी विज्ञानाच्या आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर जगाला ज्ञानसंपन्न करीत असतात. तशी ज्ञाननिर्माणशक्ती आणि ज्ञानसंपन्नता लेखकांजवळ नसली तरी श्रेष्ठ लेखकांची स्वत:ची म्हणून एक क्षमता असते. ती केवळ ग्रंथ अभ्यासून आलेली नसते. नैसर्गिक प्रतिभाबळामुळे आलेली ती एक आगळी विश्वप्रचीतीच असते. तिचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे, ती किती सूक्ष्म आणि अंतर्भेदी आहे, यावर जीवनदृष्टी अवलंबून आहे.
जीवनदृष्टी म्हणजे जीवनासंबंधी केलेला पोकळ विचार नव्हे. ती लेखकांच्या सहेतूक कृतिपूर्णतेतून सिद्ध होत असते. एरव्ही, जीवनदृष्टीचा दावा करणाऱ्या लेखकांच्या साहित्यविचारात अभिनिवेशापेक्षा अधिक काही असण्याची शक्यता जशी नाही, तशीच त्यांच्या वाड्.मयकृतीतही शब्दावडंबरापेक्षा वेगळे काही असण्याची शक्यताही नाही.
जीवनदृष्टी आणि अनुभूती याच्या परस्पर संबंधांचे दिग्दर्शन करीत असताना अनुभूतीविषयी अगत्यपूर्वक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, लेखकाला जगत असताना सातत्याने अनुभव येत असतो, पण येणारा प्रत्येक अनुभव इतका असामान्य, चटका लावणारा, फिरफिरून विचार करायला भाग पाडणारा नसतो की, जो पुढे जाऊन अनुभूतीरूप होऊ शकेल. एकतर, असा असामान्य अनुभव लेखकाला आला पाहिजे किंवा सामान्य अनुभवातून असामान्य जीवनदर्शी अनुभूती त्याला प्राप्त झाली पाहिजे की, जी त्याला साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकेल, असे काळे यांनी सांगितले.
सत्य आणि सत्त्वांचा वेध न घेता मराठीतील अनेक लेखक आयत्या सामग्रीवर आपली निर्मिती करताना दिसतात. पुराणांनी आणि दोन आर्ष महाकाव्यांनी मराठी वाड्.मयाच्या निर्मितीपासूनच आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील मूळ कथावस्तू, व्यक्ती आणि नाट्यमय प्रसंगाची भारतीय मनावर एवढी मोहिनी आहे की, मराठी लेखक मग तो प्राचीन काळातील असो की अर्वाचीन काळातील, त्याला बळी पडला आहे. ज्ञानेश्वरांसारखा एखादाच कवी त्यातील गीतेसारख्या सामग्रीवर भाष्य करताकरता श्रेष्ठ नवनिर्मितीचा प्रत्यय देऊ शकला. ज्ञानेश्वरीसारखा अपूर्व ग्रंथ लिहिलेल्यावर ही अमृतानुभवांच्या निर्मितीची निकड ज्ञानेश्वरांना का भासली, हे देखील आपल्याला इथे लक्षात येऊ शकेल.
पुष्कळदा विशिष्ट प्रकाराची नाटके, कादंबऱ्या, काव्यप्रकार यांची वेगवेगळ्या काळांत लाट उसळते. ती एक वाड्.मयीन फॅशनच होऊन बसते. तशी निर्मिती केली नाही तर जणू काही मागासलेपणाचा शिक्का आपल्यावर बसेल की काय, या भीतीने किंवा त्याप्रकारात लिहून सामान्य लेखक ही मिरवतात. तर, त्यांच्यापेक्षा अधिक चांगले लिहून आपणही का मिरवू नये, या विचाराने काही एक गुणवत्ता प्राप्त झालेले लेखकही त्या लाटेत ओढले जातात. असाच ओढले जाण्याचा प्रकार रंजनवादी साहित्याच्या लोकप्रियतेच्या प्रभावांमुळेही घडून येतो. रंजनप्रधान साहित्य ही विशिष्ट वाचन अभिरुचीची अपरिहार्य गरज असते. जाणीवपूर्वक रसिकरंजनाचीच भूमिका स्वीकारणाऱ्या कवी, लेखकांची उद्दिष्ट्ये अगदी स्पष्ट असतात. त्यानुसार आपल्या ललितकृतीची रचना ते कृत्रिम पद्धतीने करतात. समीक्षा हा ललित लेखकाला खिंडीत गल्ला चढवणारा आणि युयुत्सुपणाचे बिरुद मिळवणारा भयपुरुष नाही. मूलत: तो रसिक आस्वादक असून साहित्य कृतीचा सरंक्षक आणि सुबुद्ध, सुसंस्कृत, प्रशंसक आहे. शास्त्र काट्याच्या कसोटीवर ललितकृतीला तोलून पाहणे हा त्याचा धर्म आहे. समीक्षा भयरूपिणी नाही. तिने तसे असू नये. ती ललित कृतीची धाकटी जिवलग सखी आहे, तिचे कौतुक करणारी प्रसंगी मोठेपणा धारण करून शहाणपणाच्या चार गोष्टी सांगणारी. तिचे अस्तित्व स्वतंत्र नाही हे खरेच, पण वाड्.मयीन संस्कृतीच्या जडणघडणीत तिचे स्थान अपरिहार्य आहे, हे तेवढेच खरे.