‘चित्रकृतींचे दहन’ आंदोलन करणार !
By admin | Published: February 4, 2017 01:50 AM2017-02-04T01:50:11+5:302017-02-04T01:50:11+5:30
बेरोजगार कला शिक्षक आक्रमक; शासनाच्या नियुक्ती धोरणाचा निषेध.
वाशिम, दि. 0३- राज्य शासनाने कला शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे हजारो कला शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या कला शिक्षकांनी स्वनिर्मित चित्रकृतींचे दहन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. वाशिम जिलतील गणेश वानखडे या चित्रकाराच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ फेब्रुवारीला हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने काही वर्षांपासून कला शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. त्यातच शासनाने शालेय स्तरावरील कला शिक्षकांचे नियमित पद न भरता अतिथी कला निदेशक पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शंभरहून अधिक पटसंख्या असणार्या शाळांत किमान ५0 रुपये तासिकेनुसार आणि अधिकाधिक पाच हजार रुपये मासिक मानधन देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांतील कला शिक्षक बेकारच झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, ह्यअतिथी कला निदेशक म्हणून विनामानधन काम करण्यास तयार आहे,ह्ण असे प्रतिज्ञापत्र या पद भरतीमध्ये कला शिक्षकांकडून शंभर रुपयाच्या बॉन्डवर लिहून घेतले जाते. शासनाच्या या धोरणामुळे कला शिक्षकांत संतापाची लाट उसळली आहे. याचा निषेध करण्यासाठी मंगरुळपीर येथील गणेश वानखडे यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या बेरोजगार कला शिक्षकांना एकत्र आणून त्यांच्या स्वनिर्मित चित्रकृतींचे दहन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनासाठी त्यांना सांगली, पुणे, अकोला, अमरावती, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कला शिक्षकांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दहनापूर्वी या चित्रांचे प्रदर्शन भरवून लोकांना या आंदोलनाची माहिती देण्यात येणार आहे. या संदर्भात वानखडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे.
शासनाने कला विषयासाठी अतिथी निदेशकाचे पद न भरता कला शिक्षकाचे नियमित पद भरावे, तसेच कार्यरत अतिथी कला निदेशकांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी चित्रकृती दहन आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला राज्यभरातील ५0 हून अधिक कला शिक्षकांचा पाठिंबा आहे.
-गणेश वानखडे,
चित्रकार, मंगरुळपीर.