राज्यात पेट्रोलपंप चालकांचे बुधवारपासून आंदोलन
By admin | Published: May 9, 2017 02:05 AM2017-05-09T02:05:14+5:302017-05-09T02:05:14+5:30
कमिशन वाढीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी, १० मे पासून पेट्रोल खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कमिशन वाढीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी, १० मे पासून पेट्रोल खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना कोणताही त्रास होणार नसला, तरी मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील आठवड्यापासून दर रविवारी आणि सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा फामपेडा या वितरकांच्या संघटनेने दिला आहे. सरकार आणि तेल कंपन्या पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांबाबत उदासीन असल्याचा आरोपही फामपेडाने केला आहे.
फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वचंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल डिलर्सच्या अडचणीबाबत शासनाने एक समिती तयार केली होती. या समितीने तीन वर्षांपूर्वी शासन दरबारी अहवाल सादर केला आहे. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर १ रूपया ४८ पैसे, तर पेट्रोलला प्रति लीटर २ रुपये ४५ पैसे इतके कमिशन मिळते. याउलट पेट्रोलपंपाचा व्यवस्थापन खर्च, नियमांचे पालन, सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे हा व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे.
कमिशनवाढीचा निर्णय न झाल्यास पेट्रोलपंप चालक आपल्या खर्चात बचत म्हणून रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी पंपावरील व्यवहार बंद ठेवतील. शिवाय सोमवारी, १५ मेपासून रोज एकाच शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक पेट्रोलपंप सकाळी ९ वाजता पेट्रोल व डिझेलची विक्री सुरू करून सायंकाळी ६ वाजल्यानंतर पेट्रोलपंप बंद ठेवतील. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली आहे.