विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 01:05 AM2016-10-19T01:05:43+5:302016-10-19T01:05:43+5:30

महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर घेण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

Movement of postponement of the Legislative Council election | विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली

विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली

Next


पुणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून १२ जागांसाठी होणारी निवडणूक महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर घेण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठीच नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता ६० दिवस अगोदर लावण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
विधान परिषदेची निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे पक्षीय बलानुसार त्यांचेच सर्वाधिक आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका व नगर परिषदांमध्ये निवडणुकांमध्ये भाजपाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतील, त्यामुळे या निवडणुकांनंतर विधान परिषदेची निवडणूक झाल्यास त्याचा भाजपाला मोठा फायदा होऊ शकेल, असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानापूर्वी केवळ ३५ दिवस अगोदर आचारसंहिता लावली जाईल असा धोरणात्मक निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता १५ नोव्हेंबरनंतर लागणे अपेक्षित होते, मात्र राज्य निवडणूक आयोगाने अचानकपणे ६० दिवस अगोदरच निवडणुका जाहीर करून आचारसंहिता लागू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता चालू असताना त्याच्या सदस्यांचे मतदान घेणे योग्य नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
>शहरातील काही वरिष्ठ पदाधिकारी नुकतेच राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, ते अनवधानाने विधान परिषदेची निवडणूक पुढे जाणार असल्याचे बोलून गेले असल्याचा किस्साही पालिका वर्तुळात चर्चिला जात आहे. एव्हाना जर केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तरी त्याविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचीही तयारी विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, तर त्याला विरोधी पक्षांकडून प्रचंड विरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Movement of postponement of the Legislative Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.