'ए दिल' विरोधात संभाजी ब्रिगेडचे कल्याणाच्या सर्वोदय मॉलमध्ये आंदोलन
By admin | Published: November 3, 2016 04:18 PM2016-11-03T16:18:15+5:302016-11-03T16:29:33+5:30
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी करण जोहर दिग्दर्शित पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला “ए दिल है मुश्कील” चित्रपटाविरोधात निदर्शने करत सर्वोदय मॉलमध्ये तो़फोड केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ३ - करण जोहर दिग्दर्शित पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला “ए दिल है मुश्कील” या हिंदी चित्रपटाचा शो सुरु असताना कल्याणाच्या सर्वोदय मॉल येथील एसएम 5 चा बुकिंग ऑफिसची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी तोडफोड केली. तसेच चित्रपट पोस्टर्सवर काळी शाई फेकून निषेध नोंदविला. पाकिस्तानी कलाकार असलेले हा चित्रपट बघू नये, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या “ ए दिल है मुश्कील” या हिंदी चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्वोदय मॉल बाहेर निदर्शने करून जोरदार विरोध केला होता.तसेच त्या वेळी दिवाळी सण असल्याने हे आंदोलन शांतेत करून दिवाळी नंतर हे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा त्यावेळी देण्यात आला होता.त्यानुसार आज दुपारी 3 च्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी मॉल बाहेर जोरदार निदर्शने करून एसएम 5 चा बुकिंग ऑफिस मध्ये काही कार्यकर्ते घुसले. त्यांनी मल्टिप्लेक्सच्या बुकिंग ऑफिसची दगडफेक करून खुर्च्यांची तोडफोड केली. यामुळे मॉल परिसरात एकच गोंधळ उडाला.तर बाहेरील कार्यकर्त्यांनी सदर चित्रपटाच्या पोस्टर्सवर काळी शाई फेकून निषेध नोंदविला.
पाकिस्तानी कलाकारांना आमचा ठाम विरोध असून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हा चित्रपट बघू नये असे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. ही माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान हे आंदोलन सुरु असतानाही सदर चित्रपटाचा शो मॉलच्या वरच्या मजल्यावर सुरूच होता. सध्या एसएम 5 मॉलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांना विचारले असता, सदर चित्रपटाचा शो हा सुरूच असून आंदोलन करून तोडफोड करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून त्यांना लवकर अटक करून योग्य ती कारवाई करण्यात येईल .