आंदोलन सुरूच, दूधटंचाई नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 06:14 AM2018-07-19T06:14:05+5:302018-07-19T06:14:22+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही.
कोल्हापूर/नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही. पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. दुसरीकडे सरकारनेच आंदोलकांनाच गनिमी कावा दाखवित, नाशिकमार्गे गुजरात व मुंबईला मोठ्या प्रमाणावर टँकर रवाना केले आहेत. नाशिकमध्ये पोलिसांनी आंदोलकांच्या मुसक्या आवळल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत झाले. बुधवारी नाशिक, जळगाव व धुळे जिल्ह्यातून सुमारे ४ लाख ७१ हजार लीटर दूध बाहेर रवाना झाले. दिवसभरात ६० टॅँकर नाशिकमार्गे पाठविण्यात आले.
दुधाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने, सरकारची नाकेबंदी करण्यासाठी गुरुवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दूध संकलन खूप कमी झाले असले, तरी पोलीस बंदोबस्तात खासगी दूध संस्थांचे टँकर शहरांकडे रवाना होत आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ करत दूध रस्त्यावर ओतले.
>राजू शेट्टी गुजरात सीमेवर
अहमदाबाद मुंबई सेंट्रल पॅसेंजरने गुजरातहून चार लाख लीटर दूध मुंबईत येणार होते. खा. राजू शेट्टी डहाणूला ठिय्या देऊन होते. मात्र, गाडीला दुधाचे डबे नव्हते. त्यावर, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
>मुंबईत दोन दिवस पुरेल एवढा साठा
मुंबईत दूधपुरवठा करणाºया ‘आरे’ व ‘महानंद’ने दोन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा असल्याची माहिती दिली आहे, पण लोक दुधाची अधिक खरेदी करत आहेत. तरीही टंचाई भासलेली नाही.
>आज नागपुरात महत्त्वाची बैठक
गुरुवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. साखरेप्रमाणे निश्चित दर हाच दुधावर तोडगा असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात तिसºया दिवशी बुधवारी आष्टी (जि. बीड) येथे दूध उत्पादक शेतकºयांनी एकाला दुग्धस्रान घातले.