चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 03:33 PM2021-03-21T15:33:32+5:302021-03-21T15:34:53+5:30
cinema Kolhapur- मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आता संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुदत संपण्यापूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक होऊन तीत सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करणे अपेक्षित असताना ही बैठक बोलावण्यात आलेली नाही. कारण यात पुन्हा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार आहे.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आता संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुदत संपण्यापूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक होऊन तीत सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करणे अपेक्षित असताना ही बैठक बोलावण्यात आलेली नाही. कारण यात पुन्हा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार आहे.
चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत मार्चअखेर संपत असून, तत्पूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक व्हावी लागते. या बैठकीत अहवाल सादर करून संचालकांची मान्यता घ्यावी लागते. त्यातच सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली जाते. या सभेत सभासदांच्या मान्यतेने निवडणूक जाहीर होते अशी ही प्रक्रिया आहे. त्यानुसार आतापर्यंत या घडामोडी होणे अपेक्षित होते. पाच वर्षांपूर्वी २४ एप्रिलला मतदान व २७ एप्रिलला मतमोजणी व ५ मे रोजी नवी कार्यकारिणी अस्तित्वात आली होती. मात्र, यापैकी कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही.
निवडणुकीच्या दृष्टीने महामंडळाची कोणतीही तयारी अजून नाही. कार्यकारिणी बैठक, सर्वसाधारण सभा, निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्या तयार करणे, त्यावर हरकती, अंतिम यादी प्रसिद्धी, मतदान या प्रक्रियेसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागतो. संचालकांनी कार्यकारिणीच्या बैठकीची मागणी केली होती. त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही.
धर्मादायकडे प्रशासकांची मागणी करणार
महामंडळाच्या जुन्या कार्यकारिणीतील १४ संचालकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये त्रुटी असून, तो संचालकांना न दाखवताच धर्मादायला सादर करण्यात आल्याची माहिती आहे. यासह अन्य बाबींवरून संचालकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मुदत संपेपर्यंत कार्यकारिणीची बैठकच झाली नाही, तर धर्मादाय आयुक्तांकडे प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात येणार आहे.
निवडणूक, मुदतवाढ किंवा प्रशासक
महामंडळाचे ३५ हजारांवर सभासद असून, ते राज्यभर आहेत, सध्या कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने निवडणुकीबाबत संदिग्धता आहे. कार्यकारिणीची बैठक झाली, तर संचालकांनी राजीनामा देऊन प्रशासक आणायचा किंवा अध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आणून नव्या अध्यक्षांची नियुक्ती करून सहा महिने मुदतवाढ घ्यायची, या दृष्टीने मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या सभासदांच्या हालचाली सुरू आहेत.