महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट
By admin | Published: May 3, 2016 02:06 AM2016-05-03T02:06:25+5:302016-05-03T02:06:25+5:30
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर राज्य शासन पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करणार असून त्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर राज्य शासन पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करणार असून त्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
तत्कालिन आघाडी सरकारने २४ जुलै २००२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत जोतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार हा चित्रपट केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि मध्यप्रदेश शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्याचे ठरविण्यात आले होते. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावर (एनएफडीसी) सोपविण्यात आली होती. चार वर्षाच्या कालावधीत चित्रपट पूर्ण करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी १० कोटी रु पयांचा खर्च गृहित धरण्यात येऊन महाराष्ट्र शासन त्यातील अडीच कोटींचा खर्च उचलणार होते. उर्वरित साडे सात कोटी खर्चातील पाच कोटी केंद्र शासन आणि अडीच कोटी मध्यप्रदेश सरकारकडून करण्यात येईल, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, केंद्र व मध्य प्रदेश शासनाकडून त्यांचा हिस्सा मिळाला नाही. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने चित्रपटासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर केला आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्यानंतर त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या यंदाच्या १२५ व्या स्मृती वर्षात हा चित्रपट तयार होऊन प्रदर्शित झाल्यास त्याचे औचित्य साध्य होईल. त्यामुळे याबाबत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली तातडीने कार्यवाही केली जावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)