...तर प्रेमवीरांना मोगली एरंडांनी सुजविणार !

By admin | Published: February 11, 2017 11:56 PM2017-02-11T23:56:15+5:302017-02-11T23:56:15+5:30

धोक्याची घंटा : गड-किल्ल्यांवर व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याचे ‘मराठा क्रांती ग्रुप’चे आवाहन

Mowgli era will make love for the beloved ... | ...तर प्रेमवीरांना मोगली एरंडांनी सुजविणार !

...तर प्रेमवीरांना मोगली एरंडांनी सुजविणार !

Next

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या गड-किल्ल्यांवर फिरकणाऱ्या प्रेमवीरांना यंदा मोगली एरंडांनी सुजविण्याचा दम मराठा क्रांती ग्रुपच्या वतीने देण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यात नामांकित गड आणि किल्ले आहेत. इतिहासातील अनेक आठवणी आणि शूर इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड आणि किल्ले आता प्रेमवीरांचे अड्डे झाले आहेत. एकांतात नको ते चाळे करून किल्ल्यावर सहकुटुंब येणाऱ्यांना लाज वाटेल, असे वर्तन येथे प्रेमवीरांकडून केले जाते.
व्हॅलेंटाईन डे दिवशीही महाविद्यालयांना दांड्या मारून झुंडीने तरुणाई निसर्गाच्या कुशीत अर्थातच गड-किल्ल्यांवर पोहोचते. सज्जनगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, वर्धनगड आदी गडांवर या दिवशी तरुणाईची तुफान गर्दी असते. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींची यामुळे भलतीच गोची होते. यंदा व्हॅलेंटाईन डे मंगळवारी आला आहे. सातारा एमआयडीसीतील अनेक कामगार व कर्मचारी त्यांच्या साप्ताहिक सुटीचा दिवस सहकुटुंब किल्ल्यावर जातात. त्यावेळी प्रेमीयुगुलांचे चाळे त्रासदायक ठरतात. त्यामुळे मराठा क्रांती ग्रुपच्या स्वयंसेवकांनी व्हॅलेंटाईन डे दिवशी हे आंदोलन छेडले
आहे. (प्रतिनिधी)


मुलांना सडकणार... मुलींच्या घरातल्यांना बोलवणार
प्रेमवीरांनी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गड-किल्ले सोडून कुठेही जाण्याला या ग्रुपचा विरोध नाही. पण चुकून जर कोणी जोडपे त्यांना गड-किल्ल्यावर आढळले तर त्यांना शिक्षा काय देण्यात यावी याविषयी त्यांनी ठरवले आहे. मुलांना मोगली एरंडांनी फटके देण्यात येणार आहेत, तर मुलींच्या घरातल्यांना फोन करून बोलवून त्यांना याविषयीची माहिती देऊन मगच मुलींना सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं किंवा न करण्याचा अधिकार व्यक्तीगत आहे. त्यामुळे त्या अधिकारावर आम्ही आक्षेप घेणार नाही. पण गड-किल्ल्याच्या आश्रयाने प्रेमवीरांचे ओघळवाणे वर्तन आम्ही कदापि सहन करणार नाही. गड-किल्ल्यावर घडणाऱ्या अनैतिक प्रकारांवर हा हल्लाबोल असणार आहे.
- राहुल भोसले,
मराठा क्रांती ग्रुप, सातारा

सहभागी होण्याचे आवाहन
मराठा क्रांती ग्रुपच्या वतीने सातारा तालुक्यातील गड-किल्ल्यांवर प्रेमवीरांना अटकाव करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनी या मोहिमेत आपापल्या भागासाठी सामील होण्याचे आवाहन राहुल भोसले यांनी केले आहे.

मोगली एरंडंच का?
पूर्वी साप निघाले की लोक मोगली एरंडांने या सापांना मारायचे. या एरंडाचा जोराचा फटका बसला तर शरीरावर झिणझिण्या येतात. त्यामुळे मार लागलेला भाग सुजतो. विशेष म्हणजे गड-किल्ल्यांवर मोगली एरंडं मुबलक सापडते. त्यामुळे जोडपे दिसले की हे एरंडं तोडून मग प्रेमवीराला ‘प्रसाद’ मिळणार आहे.

Web Title: Mowgli era will make love for the beloved ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.