उंबार्ली पक्षी अभारण्याला सरकार दरबारी मान्यता मिळवून देणार: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 PM2021-06-16T16:46:03+5:302021-06-16T16:48:06+5:30
कल्याण-डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीला कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली.
कल्याण:कल्याण-डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीला कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज (बुधवार) सकाळी भेट दिली. या टेकडीवरील वन्यसृष्टी आणि पक्षी अभारण्याला सरकार दरबारी मान्यता मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार शिंदे यांनी यावेळी दिली.
आज (बुधवार) सकाळीच खासदार शिंदे यांनी टेकडीच्या पायथ्यापासून टेकडीची चढाई केली. यावेळी त्यांनी थंडगार हिरवाईतील मोकळ्या स्वच्छ शुद्ध हवेचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे आणि पदाधिकारी राजेश कदम यांच्यासह टेकडी परिसरातील धामटण, दावडी, भाल या परिसरातील नागरीकही यावेळी उपस्थित होते. या टेकडीवरील वन्यसृष्टीत विविध जातीचे पक्षी विहार करताना आढळून येतात. या पक्षांची तहान भागावी यासाठी उन्हाळ्यातच खासदार शिंदे फाऊंडेशनच्या वतीने पाण्याच्या दोन टाक्या टेकडी परिसरात बसविण्यात आल्या होत्या. पावसाळ्यात टेकडीवर पाण्याचे संवर्धन व्हावे, यासाठी बंधाऱ्याची डागडुजी करण्यात यावी. तसेच या ठिकाणच्या वनराईचे संरक्षण व्हावे अशा सूचनाही यावेळी खासदार यांनी वन अधिकारी वर्गास दिल्या आहेत. या जागेला संरक्षक भिंत बांधली जावी, असे त्यांनी सूचित केले आहे. खासदारांनी त्यांच्या हस्ते याठिकाणी वृक्षारोपण केले.