खासदार गोपाळ शेट्टी यांचा पालिकेला घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 10:18 PM2017-05-14T22:18:38+5:302017-05-14T22:18:38+5:30
क्लीन अप मार्शलकडून दंड ठोठावण्याच्या पालिकेच्या या योजनेविरोधात भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेला घरचा आहेर दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेच्या क्लीन अप मार्शलकडून दंड ठोठावण्याच्या पालिकेच्या या योजनेविरोधात भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेला घरचा आहेर दिला आहे. पहिला असलेला कचरा उचला मग दंड लावा असे खडे बोल त्यांनी पालिकेला सुनावले आहेत. त्यामुळे पालिकेच्या क्लीन अप मार्शल योजनेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोरिवली पश्चिम साईबाबानगर येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी या योजनेबद्दल आसूड ओढले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि एका राज्याचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेचा स्वच्छतेत देशातील 500 शहरांमध्ये 29वा क्रमांक लागतो हे मुंबई महानगरपालिकेला भूषणावह नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे मुंबईत आहे तो कचरा रोज साफ करा असे परखड मत त्यांनी मांडले.
दरम्यान लोकमतने स्ट्रिंग ऑपरेशन केल्यावर अंधेरी तसेच दादर रेल्वे स्थानक पूर्व येथील टपरीच्या बाहेर आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पालिकेचे क्लीन अप मार्शल लपून उभे असतात.आणि नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यावर त्याला गुन्हेगाराप्रमाणे दुय्यम वागणूक देऊन त्यांच्याकडून दमदाटी करून सर्रास दंड आकारतात आणि तोडपाणी देखील करतात असे आढळून आले आहे. या प्रकरणी नागरिकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की,जर आम्ही कचरा टाकला असेल तर दंड करा परंतू एकाद्या गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देऊ नका. नागरिकांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण पालिकेने क्लीन अप मार्शल यांना देणे गरजेचे असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.