खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 09:03 AM2024-10-18T09:03:03+5:302024-10-18T09:03:43+5:30
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खा. प्रिया दत्त यांच्याऐवजी आ. वर्षा गायकवाड यांना तर भाजपने माजी खा. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिममधून काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे.
महेश पवार
-
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये संधी नाकारण्यात आलेले आणि पराभूत झालेल्या मुंबईतील काही माजी खासदारांनी आपली पावले आता विधानसभेच्या दिशेने वळवली आहेत. विधानसभेची उमेदवारी मिळवून आमदार होण्यासाठी हे माजी खासदार जोरदार प्रयत्न करत आहेत. यात प्रामुख्याने गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, संजय निरूपम, राहुल शेवाळे, प्रिया दत्त यासारख्या माजी खासदारांचा समावेश आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खा. प्रिया दत्त यांच्याऐवजी आ. वर्षा गायकवाड यांना तर भाजपने माजी खा. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिममधून काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे.
२००९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसचे संजय निरूपम यांनी भाजपचे राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र, २०१४ मध्ये त्यांना भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी पराभूत केले. निरूपम सध्या शिंदेसेनेत असून, त्यांनी दिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
दक्षिण मध्य मुंबईतून शिंदेसेनेचे राहुल शेवाळे हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, यावेळी उद्धवसेनेचे अनिल देसाई यांच्याकडून ते पराभूत झाले. चेंबूरमधून शिंदेसेनेचे उमेदवार म्हणून शेवाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
पूनम महाजन यांचे काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने मनोज कोटक (मुंबई उत्तर पूर्व), पूनम महाजन (मुंबई उत्तर मध्य) आणि गोपाळ शेट्टी (मुंबई उत्तर) यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. ज्या खासदारांना तिकीट नाकारले त्यांना विधानसभेत उमेदवारी देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्लीमधून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेट्टी यांनी बोरिवली आणि कोटक यांना मुलुंडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर पूनम महाजन यांच्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे पूनम महाजन काय निर्णय घेणार, याकडेही लक्ष लागले आहे.