विभागवार बैठका घेऊन खासदारांचे प्रश्न सोडविणार - मुख्यमंत्री ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 05:30 AM2021-01-22T05:30:06+5:302021-01-22T05:33:10+5:30
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली.
मुंबई : राज्यातील सर्वपक्षीय खासदारांचे जे प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत ते सोेडविण्यासाठी खासदारांच्या विभागनिहाय बैठका घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्य सचिवांना दिले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.
आरक्षणप्रश्नी पंतप्रधानांना साकडे
मराठा आरक्षणाबाबत ५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनालाही बाजू मांडावी लागणार आहे. मधल्या काळात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.
सीमाप्रश्नी पंतप्रधानांना भेटा -
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्नाटकात सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी याप्रश्नी त्यांची भूमिका सारखीच असते.
- आपणही एकजूट दाखवून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेण्याचे आवाहन त्यांनी खासदारांना केले.