"राजकारण करायचं नाहीतर पाणीपुरी विकायची का?"; कंगना रणौतचे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 09:33 AM2024-07-18T09:33:38+5:302024-07-18T09:36:36+5:30
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर टीका करताना खासदार कंगना रणौतने राजकारणी राजकारण करणार नाहीतर काय करणार असं म्हटलं आहे.
Shankaracharya Avimukteshwaranand : ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंबाबत काही विधाने केली होती. 'उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, त्यांना धोका देणारे खरे हिंदू नाहीत', असे विधान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केले. यावरुन शिंदे गटाने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता अभिनयतातून राजकारणात आलेल्या खासदार कंगना रणौतनेही अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर निशाणा साधला.
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या घरी पूजा करून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाल्याचे म्हटलं. खरा हिंदू विश्वासघात करणारा नसून सहन करणारा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही तेच झाले, असे अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. त्यानंतर आता खासदार कंगना रणौतने राजकारणी राजकारण करणार नाहीतर काय करणार असं म्हटलं आहे.
"राजकारणात, युती, आघाडी, पक्ष व नेत्यांमधील करार आणि एखाद्या पक्षाचं विभाजन होणं अत्यंत सामान्य तसेच संवैधानिक (घटनात्मक) बाब आहे. १९०७ साली आणि त्यानंतर १९७१ साली काँग्रेस पक्षाचं विभाजन झालं होतं. राजकारणी लोक राजकारणात राजकारण करणार नाहीत तर मग काय पाणीपुरी विकणार का?," असा सवाल खासदार कंगनाने केला.
"शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा, प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे. धर्म सांगतो की, राजाच जर प्रजेचं शोषण करू लागला तर देशद्रोह हा शेवटचा धर्म आहे. शंकराचार्यांनी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे. त्यांनी अपमानजनक शब्दांचा वापर करून मुख्यमंत्र्यांवर देशद्रोही, गद्दार व विश्वासघातकी असल्याचा आरोप करत सर्वांचा भावना दुखावल्या आहेत. शंकराचार्य अशा छोट्या आणि क्षुल्लक गोष्टी सांगून हिंदू धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत," असेही कंगना रणौतने म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
"आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा विश्वासघात आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही. विश्वासघात करणारा हिंदू नसतो. पण विश्वासघात सहन करणारा मात्र निश्चितच हिंदू असतो. त्यामुळे विश्वासघात करणारे कसे हिंदू असतील? उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना ठावूक आहे. निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. सरकार पाडून जनमताचा अनादर करणे ही चांगली गोष्ट नाही," असं अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं होतं.