नंदुरबारचा आदिवासी ते पालघरचा खासदार, राज्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:25 PM2019-05-24T23:25:01+5:302019-05-24T23:25:06+5:30
राजेंद्र गावितांचा प्रवास : काँग्रेस ते सेना व्हाया भाजप
हितेन नाईक
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार या जिल्ह्यात राजेंद्र गावीत यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. शिक्षणासाठी ते मुंबईत आलेत. त्यांनी बी.ए.ची डीग्री मुंबई विद्यापीठातून मिळविली. त्यानंतर एका गॅस कंपनीची एजन्सी सुरू केली. त्यांचा पारंपारिक व्यवसाय हा शेती हाच होता. काँग्रेसला त्यावेळच्या डहाणू या आदिवासीबहुल मतदारसंघात एक नेता घडवायचा होता त्यासाठी नव्या होतकरू व्यक्तीचा शोध सुरू होता. या वेळी हा परिसर उत्तर मुंबईत लोकसभा मतदारसंघात होता आणि राम नाईक या भाजपाच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करून अभिनेता गोविंदा येथील खासदार होता. अभिनेता म्हणून त्याचा प्रभाव ओसरणीला लागला होता. तसेच पालघरला स्वतंत्र जिल्हा होण्याचे वेध लागले होते. दामू शिंगडा, शंकर सखाराम नम असे नेते येथे होते. परंतु त्यांच्यातील गटबाजी आणि सेना भाजप युतीचे तगडे आव्हान पेलण्यासाठी नवा चेहरा देणे काँग्रेसला आवश्यक वाटत होते. परंतु काँग्रेसने त्यांना आधी विधानसभेची उमेदवारी दिली आणि ते पालघरमधून निवडून आले. त्यांना आदिवासी विकास राज्यमंत्री हे पद देण्यात आले. त्यारुपाने पालघर जिल्ह्याला मंत्रीपदाचा लाभ झाला होता. गावितांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर आपला जनसंपर्क आणि प्रभाव वाढविण्यासाठी केला.त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. त्यानंतर भाजपाचे चिंतामण वनगा यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. परंतु वनगा यांचे निधन झाले.
पोटनिवडणूक घ्यावी लागली. त्यावेळी शिवसेनेने वनगा यांचे पूत्र श्रीनिवास याला शिवसेनेत घेऊन उमेदवारी दिली तर त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या गावितांना भाजपामध्ये आणून लोकसभेची उमेदवारीही दिली. तिचे गावितांनी सोने केले व ते खासदार झाले. त्यानंतर शिवसेनेने त्यांना शिवबंधन बांधून पालघरची उमेदवारी दिली तिचेही सोने करून ते खासदार झाले.
राजेंद्र गावित
काँग्रेस, नंदुरबारचे, (वय : ५०)
शिक्षण : बी.ए. (मुंबई विद्यापीठ)
पत्नी उषा, एक मुलगा, एक मुलगी
पारंपारिक व्यवसाय शेती
सध्याचा व्यवसाय मीरारोड येथे गॅस एजन्सी
भूषविलेली पदे एकदा आमदारकी, एकदा खासदारकी, एकदा राज्यमंत्रीपद
आता दुसऱ्यांदा खासदारकी भूषवित आहेत.
अफलातून नशीब
२०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर ऐनवेळी काँग्रेसने रद्द केली होती. त्याच गावितांना भाजपाने काँग्रेसमधून आणून याच मतदारसंघात खासदारकीची उमेदवारी दिली. तर पुढील निवडणुकीत शिवसेनेने त्यांना भाजपामधून सेनेत आणून खासदारकीची उमेदवारी दिली व ते दोनही वेळी जिंकले
आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री
गावित यांनी काँग्रेसच्या मंत्रीमंडळात आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्रीपद भूषविले. आपल्या मंत्रीपदाचा फायदा जनतेच्या हितासाठी जास्तीत जास्त करण्याच्या व प्रत्येक अडीअडचणीत जनतेच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा जनसंपर्क प्रचंड प्रमाणात निर्माण झाला व तोच त्यांना प्रत्येक निवडणुकीत उपयोगी पडत गेला.आदिवासी समाजात त्यांच्याइतका लोकप्रिय आणि जनसंपर्क असलेला एकही अन्य नेता या परिसरात नाही. यावरूनच त्यांच्या या कार्याची महती आपल्या ध्यानी येते. सर्वच पक्षात आणि सर्वच स्तरातील समाजात त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे त्यांचे खास राजकीय भांडवल आहे. त्याच्या जोरावरच ते राजकारणात यशस्वी होत आलेले आहेत. आता त्यांची यापुढील वाटचाल कशी होते याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
काँगे्रसमध्ये प्रवेश
काँग्रेसमध्ये प्रवेश. नव्या पिढीतील नेते घडविण्याच्या काँग्रेसच्या व्यूहरचनेमुळे गावितांकडे भावी नेते म्हणूनच पाहिले जात होते. माणिकराव गावित, झेड.एम. कहांडोळ, दामू शिंगडा या पिढीतील गावीत हे नेते आहेत.
20०९
राज्यमंत्री झाले
पालघरचे आमदार म्हणून काँगेसकडून विजयी. त्यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपद मिळाले. पालघर जिल्हा निर्माण करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची
होती.
2019
शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेने पालघरची जागा स्वत:कडे घेतली व तिच्याकडे त्यासाठी विनिंग कॅन्डीडेट नसल्याने मुख्यमंत्र्यांना गळ घालून गावितांना शिवसेनेत येऊ द्या. अशी विनंती केली. त्यानुसार फडणवीसांनी संमती देताच गावितांनी शिवबंधन बांधले. व सेनेत जाऊन पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवून निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय देखील प्राप्त केला.
एक वर्षात गावितांनी काँगे्रस, भाजपा, शिवसेना असा तिहेरी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे या तीन पैकी दोन वेळा त्यांना लोकसभेच्या उमेदवारीचे बक्षिस मिळाले. व ते त्या निवडणुकीत विजयी ठरले. हे देखील एक आश्चर्य मानले जाते. अशा प्रकारचा योगायोग आजवर कुठल्याच नेत्याच्या नशिबी आलेला नाही. काँगे्रसमध्ये ज्यांनी त्यांना गटबाजींना दाबून मारले ती मंडळी आज गावितांच्या भाग्याचा नक्कीच हेवा करीत असतील.