हनुमान चालिसेवरून रान उठवणाऱ्या नवनीत राणा फसल्या, हनुमानासंदर्भात प्रश्न विचारताच गडबडल्या; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:35 AM2022-05-17T10:35:45+5:302022-05-17T10:58:58+5:30
या व्हिडिओत राणा दांपत्य एका वृत्त वाहिणीला मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी अँकरने हनुमानासंदर्भात नवनीत राणा यांना विचारलेल्या एका प्रश्नावर हे दांपत्य गडबडल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात हनुमान चालीसेवरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रावरील संकट दूर व्हावे यासाठी आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार, असे म्हणत नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्याने जबरदस्त राण उठवले होते. यासाठी राणा दांपत्य मुंबईतही पोहोचले. पण शिवसैनिकांच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणता आली नाही. यावेळी, पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. यानंतर हे दांपत्य 14 दिवस तुरुंगातही होते.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दांपत्य थेट दिल्लीला पोहोचले आणि तेथे त्यांनी हनुमान चालीसा पठण केले. या घटनेनंतर राणा दांपत्य चांगलेच चर्चेत आहे. आता राणा दांपत्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राणा दांपत्य एका वृत्त वाहिणीला मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी अँकरने हनुमानासंदर्भात नवनीत राणा यांना विचारलेल्या एका प्रश्नावर हे दांपत्य गडबडल्याचे दिसून आले.
राणा दांपत्याने टाइम्स नाऊ नवभारतला दिलेल्या या मुलाखतीवेळी अँकरणे नवनीत राणा यांना विचारले, की आपण हनुमानाच्या एवढ्या भक्त आहात, तर मला सांगा की, हनुमानाचे नाव हनुमान कसे पडले? हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नवनीत राणा एकदम गडबडल्याचे दिसून आले. यावेळी नवनीत यांच्या जवळ असलेले रवी राणाही शांत बसले होते. यावर नवनीत राणा यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही. यानंतर, अँकरणे त्यांना पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारला. यावर, "आपण इतिहासात घेऊन जात असाल, तर इतिहासही पुन्हा वाचला जाईल. पण, मी हनुमान चालीसा वाचते, यासंदर्भात मी नक्की बोलू शकते," असे उत्तर नवनीत राणा यांनी दिले. हा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
😂😂😂😂😂😂 https://t.co/9z62SeuOwu
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2022
लोकसभा अध्यक्षांची घेतली होती भेट -
हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दांपत्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली होती. यावेळी, अटकेपासून ते सुटकेपर्यंत आणि रुग्णालायापासून ते घरी पोहोचेपर्यंतचा संपूर्ण घडामोडींची माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याच बरोबर, माझ्या तक्रारीची दखल घेत, मला संपूर्ण बाजू मांडण्यासाठी 23 तारीख देण्यात आली आहे, असेही राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.