“योग्य वेळी योग्य निर्णय घेतो”; भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर खासदार नवनीत राणांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 03:52 PM2024-03-03T15:52:35+5:302024-03-03T15:53:12+5:30

MP Navneet Rana News: भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरून आम्ही नेहमीच चर्चेत असतो, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

mp navneet rana reaction over discussion on likely be join bjp in lok sabha election 2024 | “योग्य वेळी योग्य निर्णय घेतो”; भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर खासदार नवनीत राणांचे सूचक विधान

“योग्य वेळी योग्य निर्णय घेतो”; भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर खासदार नवनीत राणांचे सूचक विधान

MP Navneet Rana News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपानेही १९५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यामध्ये समावेश नाही. यावरून आता भाजपावर टीका केली जात आहे. यातच अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, यावर नवनीत राणा यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांना भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, मी आणि रवी राणा भाजपात जाणार ही चर्चा नेहमी सुरू असते. आम्ही बोललो तरी चर्चा होते, तसेच यासंदर्भात काही बोललो नाही, तरी चर्चा असते. त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो, असे नवनीत राणा यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना सांगितले. 

कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही

आम्ही एनडीएबरोबर आहोतच, त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखे नाही. नमो युवा संमेलन आहे. एनडीएचे घटक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. इतर लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहेत? काय बोलत आहेत? यामध्ये पडणार नाही. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही. आम्ही गरिबांसाठी काम करतो आणि तेच करत राहणार, असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्‍याची सवय आहे. जे होणार आहे, तेच आम्‍ही बोलतो. अमरावती लोकसभा मतदार संघातून कुठल्‍याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हटले होते. यावर नवनीत राणा यांनी सदर भाष्य केले.
 

Web Title: mp navneet rana reaction over discussion on likely be join bjp in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.