Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंचा अहंकार बाहेर पडत होता, मुंबईकर जनता जागा दाखवून देईल”; राणांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:29 PM2022-09-22T21:29:37+5:302022-09-22T21:31:00+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणातून अहंकार आणि अहंकारच दिसत होता हेच सर्व जनतेने पाहिले, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गटप्रमुखांच्या नेत्यांना जाहीररित्या संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिले. यानंतर शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासह भाजप नेतेही उद्धव ठाकरेंवर पलटवार करत आहेत. यातच आता अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली ती सभा नव्हती. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आव्हान देत होते, ते आव्हान नव्हते, तर तो उद्धव ठाकरे यांचा अहंकार बाहेर पडत होता.या बरोबरच कालच्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल. मला वाटते की, एक म्हण आहे की, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात स्वत: पडतो. हीच स्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
मुंबईची जनता निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देईल
आम्हाला असे वाटले होते की कालच्या सभेत ते एक कबुली देतील. ती अशी की मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मी विसरलेलो आहे, त्यामुळे बाळासाहेबांनी मला माफ करावे, असे ते म्हणतील असे आम्हाला वाटत होते. पण त्यांनी माफी मागितली नाही. माफी न मागता उलट त्यांचा अहंकार लोकांसमोर बाहेर पडला आहे. इतके नक्की आहे आहे की हा अहंकार पाहून मुंबईची जनता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा दावा नवनीत राणा यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे इतरांवर टीका करतात की, हे दिल्लीमध्ये जाऊन झुकतात. मात्र, उद्धव ठाकरे हे दिल्लीत १० जनपथ येथे जाऊन त्यांनी तेथे किती लोटांगण घातले हे महाराष्ट्राची जनता जाणते. गेल्या अडीच वर्षांत जनतेने सगळे पाहिले आहे. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारून त्यांच्याकडून १० जनपथाची जी-हुजुरी सुरू होती. फक्त अहंकार आणि अहंकारच त्यांच्याकालच्या भाषणात दिसत होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली.