Maharashtra Political Crisis: जाधव कुटुंबात राजकीय फूट! मोठा भाऊ शिंदे गटात, पण धाकट्याला पक्षात ठेवण्यात ठाकरेंना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:46 PM2022-07-28T12:46:40+5:302022-07-28T12:47:34+5:30
Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटावरून आता राज्यातील अनेक कुटुंबात राजकारण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे, राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्याकडे येण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत असून, शिवसैनिक शिंदे गटात जाणार नाहीत, यासाठी उद्धव ठाकरेंचा कस लागताना दिसतोय. यातच जाधव कुंटुंबातील खासदार असलेला मोठा भाऊ शिंदे गटात सामील झाला असून, माजी नगराध्यक्ष आणि गटनेता असलेला धाकटा भाऊ मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे दिसत आहे. प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रातून छापून आलेल्या जाहिरातीतही संजय जाधव यांनी ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असाच करण्यात आला आहे.
खासदाराच्या कुटुंबातच भूकंप
संजय जाधव हे प्रतापराव जाधव यांचे सख्खे धाकटे भाऊ. ते उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत असल्याने भावाभावांतील मतभिन्नतेविषयी चर्चा रंगली आहे. तर, खासदाराच्या कुटुंबातच भूकंप झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हादरे बसले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या अन्य नेत्यांसोबत त्यांचे फोटो झळकत आहेत. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून उद्धव साहेब हे माझे नेते असल्याचेही संजय जाधवांनी सांगितले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुलडाणा जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने हकालपट्टी केली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीहून पुनश्च प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व पदांच्या नेमणुकीचे अधिकारही दिले.