आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:56 AM2023-08-03T08:56:19+5:302023-08-03T08:57:03+5:30
दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असं राजन विचारेंनी म्हटलं.
मुंबई – आज आनंद दिघे असते तर ही गोष्ट कधीच घडली नसती. ही वेळ पण आणून दिली नसती. आनंद दिघेंच्या हंटरचा प्रसाद कित्येक लोकप्रतिनिधींनी खाल्ला आहे. दिघेंची आदरयुक्त भीती होती. उद्धव ठाकरे सरळ, साधा माणूस, आनंद दिघे गेल्यानंतर २२ वर्ष त्यांनी एका माणसावर संपूर्ण विश्वास ठेवला. सर्वकाही पदे दिले. तुम्हाला काय दिले नाही. पण विश्वासाचा विश्वासघात केला गेला. एवढे काही देऊन सुद्धा दुर्दैवाने तुम्ही असे करत असाल तर जनता माफ करणार नाही अशा शब्दात खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे.
राजन विचारे म्हणाले की, ठाण्याला गद्दारीचा दुसरा कलंक लागलाय. २० फेब्रुवारी १९८९ साली त्यावेळी प्रकाश परांजपे महापौरपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. तेव्हा ३ जणांनी गद्दारी केली. विश्वासघात झाल्यामुळे महापौर झाला नाही. त्यावेळी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी राजीनामा दिला होता. बाळासाहेबांच्या आदेशाने ३० जणांनी राजीनामे दिले होते. संख्याबळ असून सत्ता शिवसेनेच्या हातून गेली होती. आनंद दिघेंना टाडा अंतर्गत शिक्षा होऊन २ वर्ष तुरुंगात होते. गद्दारांना क्षमा नाही असं म्हटलं. त्यानंतर गद्दारांची हत्या झाली होती. लहान मुलांचा, महिला, ठाणेकर नागरिक, आदिवासींचा मोर्चा आनंद दिघेंच्या समर्थनार्थ निघाला. ती परिस्थिती वातावरण निर्माण झाले होते. प्रभाकर हेडगे तेव्हा ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आहेत ते काँग्रेसचे होते तरीही त्यांनी दिघेंचे वकिलपत्र घेतले होते. आनंद दिघे सर्वांना न्याय देत होते असं त्यांनी सांगितले. शिवसेना आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये विचारेंची मुलाखत घेतली त्यात ते बोलत होते.
त्याचसोबत दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. तशी कामे करावी लागतात. आज खुर्चीसाठी आपल्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले जाते. दिघेंनी लोकांना घडवण्याचे काम केले, कुणाला उद्ध्वस्त केले नाही. आत्ताचे राजकारण घाणेरडे झाले आहे. यापुढे चांगली माणसे राजकारणात येणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला घडवले त्यांनाच तुम्ही संपवायला निघालेत. ५७ वर्ष शिवसेना घडवण्यासाठी गेले. शिवसेना संघटनेसाठी कित्येकांचे बळी गेले, कुटुंब सोडून पक्षाचे काम करतायेत. ४० वर्षापूर्वी शाखा बांधली, त्यावर कब्जा करतायेत. आनंद दिघेंचे आनंदाश्रम नाव बदलतायेत. तुम्हाला लाज वाटतेय का? असा संतप्त सवालही विचारेंनी केला.
दरम्यान, गद्दारीला कुठेही थारा नव्हता. २० जून २०२२ ही तारीखही ठाणेकर विसरू शकत नाहीत. राजन विचारेच्या मागून शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर माझी किंमत शून्य. मला बाळासाहेबांच्या विचारामुळे निवडून देतात. कित्येक शिवसैनिक ज्यांना आजपर्यंत काही मिळाले नाही. आज ते लोक उभे आहेत. पण तुम्हाला इतके सर्व देऊनही तुम्ही गद्दारी केली. त्यामुळे जनता तर माफ करणार नाही अन् परमेश्वरही तुम्हाला माफ करणार नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला पक्षाने न मागताच सर्वकाही दिले. निष्ठावंताने हाच विचार करायला हवा असंही खासदार राजन विचारे यांनी सांगितले.